धाराशिव – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीच्या निधी स्थगितीचा वाद मिटला असुन चिंता नको, भाजप कार्यकर्ते यांचा सन्मान ठेवायला सक्षम आहे असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे म्हणत असले तरी अर्थ विभागाचे स्थगिती उठल्याचे पत्र येईना झाले आहे.
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 2024-25 या वर्षाचा काम वाटपाचा वाद अजून मिटलेला नाही, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा करूनही स्थगिती उठल्याचे पत्र अर्थ खात्याकडून आले नाही.
2025-26 च्या नियोजनासाठी 15 ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे, त्यापूर्वी स्थगितीचे पत्र येईल का यावर ग्रामविकास मंत्री गोरे यांना विचारले असता त्यांनी वाद मिटल्याचे सांगितले. यावेळी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, भाजप नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, संताजी चालुक्य, विनोद गपाट, नितीन काळे, नितीन भोसले, सतीश दंडनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
सुरुवातीला गोरे म्हणाले, वाद नाही, चिंता नको, त्यानंतर म्हणाले किरोकळ मुद्यावर वाद होता तो मिटला, एकंदरीत वाद अजूनही कायम असल्याचे दिसते. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तक्रार केल्याने स्थगिती दिल्याचे सांगितले.निधी वाटपाबाबत सगळं सुरळीत होईल चिंतेचे कारण नाही. तुम्हाला जितकी चिंता आहे, तितकी आम्हाला पण आहे. आपण चिंता करू नका, भाजप व त्या पक्षाच्या कार्यकर्ते यांना सन्मान करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. काम वाटप व निधी वाटप व्यवस्थितीत होईल. वाद मिटायलाच लागेल, सगळे प्रश्न मार्गी लागतील. या पातळीवर वाद नाही मिटला तर मुख्यमंत्री व वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटेल.
कोणत्याही मुद्यावर वाद नाही, विनाकारण याची चर्चा होत आहे. वादावर चर्चा करण्यापेक्षा, तो निर्माण करण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर प्राधान्य दिले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. किरकोळ मतभेद होते ते मतभेद मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी व राणाजगजीतसिंह पाटील यांनी मिटवले आहेत, सगळे प्रश्न सुटले आहेत. निधी येईल असेही ते म्हणाले.