धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत सन्मानाने युती झाली तर ठीक नाहीतर भाजप पक्ष निवडणुका लढवण्यास सक्षम आहे असे म्हणत गरज पडल्यास स्वबळाचा नारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील घटक मित्र पक्षांना दिला. ग्रामविकास मंत्री गोरे यांनी भाजप कार्यकर्ता बैठकीत आगामी निवडणुकीची भुमिका स्पष्ट करीत कार्यकर्त्यांना बळ दिले.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे अत्यंत सुंदर पक्ष कार्य व नियोजन करीत असल्याने त्यांचे कौतुक केले.निवडणूक जिंकायची आहे हे डोक्यात ठेवून कामाला लागा असे ते म्हणाले. यावेळी भाजप नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, संताजी चालुक्य, विनोद गपाट, नितीन काळे, नितीन भोसले, सतीश दंडनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
आगामी निवडणुकीत उमेदवार देवेंद्र फडणवीस आहेत, असे समजून सर्वांनी कामाला लागावे, कार्यकर्ते यांनी निवडणूक कालखंडात मतभेद बाजूला ठेवावेत, एका घरात भावा भावात भांडण असते मात्र शुभ कार्य किंवा लग्नात ते सगळं विसरून स्वागतला हजर,ल असतात. भाजप कार्यकर्ते यांची ही निवडणुक सुद्धा एक लग्न कार्य आहे, निवडणुक संपली की एकमेकांच्या डोक्यात दगड घालू, मात्र या काळात मतभेद बाजुला सारू. वाद केला तर तो पण उन्हात आपण पण उन्हात अशी स्तिथी होईल असे म्हणत कान टोचले.
महायुती बाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल मात्र आपण गाव पातळीवर काही बोलु नका, त्यांची मदत होऊ शकते. आपण स्वतः लढू शकतो ती ताकत भाजप पक्षात आहे मात्र महायुतीमध्ये आपण मुख्य पक्ष आहोत त्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे. मित्र पक्षांना तातडीने उत्तर देऊ नका, संयम राखा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल मात्र विरोधकांना सडेतोड उत्तर द्या,असेही ते म्हणाले. भाजप पक्ष चिन्ह हाच उमेदवार आहे, आणि सर्व ठिकाणी झेंडा फडकवावा असे ते म्हणाले.
कार्यकर्तेवर तुसभर सुद्धा अन्याय होणार नाही, बळ देऊ, एकमेकांना साथ द्या. ग्रामविकास खाते आपल्याकडे आहे, एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासुन स्मशानभुमीत जाईपर्यंत जे काही लागते ते ग्रामविकास विभागातून मिळते, असा एकही विषय नाही जो आपल्याकडे होत नाही. अंगणवाडी भरती, शिक्षक बदली पासुन सगळं ग्रामविकास खात्याकडे आहे, त्यामुळे बारकाईने लक्ष ठेवा, कोण काय करते ते.
माझ्याकडे कोणतेही काम आले तरी मी ते राहू देणार नाही. भाजप नाव घेतल की विषय संपला, त्याचे काम करू, मी भाजपमुळे इथे उभा आहे. तुम्ही काम केले नसते तर आम्ही मंत्री झालो नसतो. युद्धाला जे काही लागेल ते सर्व बाण घेऊन निवडणुकीत उतरा युद्धाला जेव्हा वेळ लागली तर तोफ घेऊन उतरा, जे काही करायचे आहे ते करा पण निवडणुक जिंका. लढण्यापेक्षा लढून जिंकणे महत्वाचे आहे.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी पाहणी करण्यासाठी विरोधक आले आणि 2 तासात 5 जिल्हे पाहून गेले, त्यांनी सरकारकडे 10 हजार कोटीच्या पॅकेजची मागणी केली त्यांना नुकसान काय झाले हे सुद्धा माहिती नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार 800 कोटी दिले. त्यांनी हंबरडा मोर्चा काढला पण हंबरडा काढायला सुद्धा आवाज लागतो असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लागवला. शेतकरी यांना सरकारने मदत केली आहे, आजवर खरडून गेलेल्या जमिनीला कधी मदत मिळाली नाही मात्र आपल्या सरकारने ती दिली. सरकार व देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहेत असे ते म्हणाले.