धाराशिव – समय सारथी
अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्थितीमुळे गावातील सार्वजनिक मालमत्तेचे झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन खात्री करण्यासाठी तसेच उपाययोजना, विविध योजना राबविनेसाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व गावात विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत..
विशेष ग्रामसभेचे आयोजन करून सदर ग्रामसभेमध्ये गावातील सर्व सार्वजनिक मालमत्ता जसे नागरी सुविधा कामे, जन सुविधा कामे, वित्त आयोग कामे, अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या विकास योजना कामे, रस्ते, गटारी, ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी इमारत, शाळा इमारत, पशुसंवर्धन इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, ग्राम महसूल इमारत कार्यालय, कृषी कार्यालय इमारत, समाज मंदीर, स्मशानभूमी शेड तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे नेमके किती नुकसान झाले याची विशेष ग्रामसभेमध्ये माहिती घेतली जाणार आहे.
नुकसान व इतर माहितीच्या आधारे प्राधान्य क्रमाने यादी तयार करून प्राधान्यक्रम यादी जिल्हाधिकारी कार्यालयास व ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांचेकडे 17 ऑक्टोबरपर्यंत विहित तक्त्यामध्ये माहिती सादर करायची आहे.
अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेचे झालेल्या नुकसानीची माहितीसोबत योजनेचे नाव, पुर्वी झालेल्या कामाचे वर्ष, नुकसानीची टक्केवारी, दुरुस्तीसाठी नुकसानीची लागणारा खर्च याची माहिती द्यायची आहे.