धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी करणारा परंडा येथील माफिया फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख याला सोलापूर पोलिसांनी अटक केली असुन कोर्टाने 15 ऑक्टोबर बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मस्तानला बेड्या पडल्याने त्याचे ड्रग्ज तस्करीचे जाळे नेटवर्क उघड होण्याची शक्यता असुन अनेक जन रडारवर आहेत. दरम्यान मस्तानला अटक करताच ‘किंग ऑफ परंडा’ या नावाने व्हिडिओ रिल्स तयार करून त्याला त्याचे समर्थक पाठबळ व आधार देत आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे. गेली अनेक महिन्यापासुन फरार असलेला मस्तान हा पोलिसांना गुंगारा देत होता. बार्शी येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात मस्तान फरार आरोपी असुन या गुन्ह्यात परंडा येथील अनेक जन आरोपी झाले होते. मस्तानला पाठबळ कोणाचे ? हाही विषय यानिमित्ताने चर्चेत आला आहे.
भाजपचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणात आवाज उठवल्यावर तो धाराशिव व सोलापूर पोलिसांच्या रडारवर होता. बार्शी येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तो फरार असुन त्याला सोलापूर ग्रामीण पोलिस गुन्हा तपासानंतर ताब्यात घेतले जाणार आहे. परंडा, बार्शी, सोलापूरसह अन्य भागात याचे ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट काम करीत होते.
सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाकणी जवळ पोलिसांनी कारवाई करून 18 ग्राम ड्रग्जसह 4 आरोपीना 6 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मस्तान याचे नाव मुख्य आरोपी व मुख्य पुरवठादार म्हणुन निष्पन्न झाले. मस्तानसह 13 आरोपी यात निष्पन्न झाले आहेत. बार्शी येथील गुन्ह्यात फरार असतानाही त्याने ड्रग्ज तस्करी सुरूच ठेवली. सोलापूर येथील गुन्ह्यात कर्नाटक व सोलापूर येथील आरोपी असल्याने अंतरराज्य रॅकेट आहे. पोलिस निरीक्षक संजय जगताप हे तपास करीत आहेत.
गोपनीय माहितीनुसार मस्तान हा परंडा येथे येणार असल्याची माहिती मिळताच धाराशिव व सोलापूर पोलिसांनी त्याला परंडा येथून अटक करून कोर्टात हजर केले. मस्तानच्या संपर्कातील अनेक जन रडारवर आहेत.