बार्शी नाका येथे पोलिस चौकी व सीसीटीव्ही बसवण्यासाठी तारांकित प्रश्न – आमदार सुरेश धस यांची मागणी
मुलींची सुरक्षा, वाहतूक कोंडी, अतिक्रमण समस्यावर तोडगा काढण्याची गरज
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहर पोलिस ठाणे ते बोंबले हनुमान चौक या भागात अनेक शाळा, महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासेस असुन या भागात मुलींच्या छेडछाडीसारखे, तरुणाच्या गटात हाणामारीचे गंभीर प्रकार घडू नये यासाठी या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह बार्शी नाका येथे आऊट पोस्ट पोलिस चौकी सुरु करावी अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे या भागात सीसीटीव्ही व पोलिस चौकी सुरु होण्याची शक्यता आहे.
धाराशिव शहरातील बार्शी नाका परिसर हा सध्या गर्दीचा झाला असुन या भागात अनेक शाळा, कॉलेज क्लासेस आहेत. या भागात पूर्वी पोलिस चौकी होती मात्र ती आता नाही. मुलीच्या छेडछाड तसेच तरुणांच्या दोन गटात हाणामारीचे प्रकार वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी या भागात सीसीटीव्ही सुरु करणे गरजेचे आहे. प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यास या भागात चौकी सुरु करू अशी भुमिका पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे त्यानुसार जागेचा शोध सुरु आहे तसेच सीसीटीव्ही बाबत सुद्धा प्रस्ताव पाठवला आहे त्यामुळे या भागात हे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
बार्शी नाका,जिजाऊ चौक ते डायट कॉलेज रोड या भागात रस्त्याच्या लगत अनेक फळ विक्रेते यानी अतिक्रमण करुन कायम स्वरूपी दुकाने थाटली आहेत त्यामुळे या भागात मोठा वाहतूक खोळंबा होत आहे. या भागात वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. सिग्नल नसल्याने व वाहतूककोंडीमुळे अपघाताचे प्रकार अनेक वेळा घडले असुन काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे त्यामुळे या भागातील रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेते यांनी केलेले अतिक्रमण काढून टाकावे तसेच पर्याप्त उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.