धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे आठवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीची छेड काढल्या प्रकरणी दोघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी थेट शाळेत जाऊन संबंधित संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांना धारेवर धरत सुरक्षा देण्यास अपयश आल्यामुळे त्यांच्या राजीनामाची मागणी केली.
गावातील जिजामाता कन्या प्रशालेत शिक्षण घेणारी मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. तेव्हा येथील एका बियर बारवर थांबलेल्या हाजू आया शेरीकर व शोयब शेख या दोघांनी दुचाकीवरून पाठलाग केला व मुलीचे मोबाईल मध्ये फोटो काढले. याप्रकरणी घरी गेल्यानंतर मुलीने वडिलांना हा प्रकार सांगितला त्यावेळी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करण्यात आली यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
दरम्यान छेडछाडीचे प्रकार सातत्याने शाळेच्या परिसरात घडत असल्यामुळे पालक जिजामाता कन्या प्रशालीच्या शिक्षक व संस्थाचालकांकडे सातत्याने याप्रकरणी उपाययोजना करण्याची विनंती करत होते. या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पालकांनी शुक्रवारी जिजामाता कन्या प्रशालेवर मोर्चा काढला. येथे त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक राजाभाऊ आगळे यांना धारेवर धरले. तसेच संस्थेचे संस्थाचे अध्यक्ष मलंग शहा व सचिव ज्ञानदेव खापरे यांनाही धारेवर धरून शाळेच्या सुरक्षा संदर्भात जाब विचारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांनी हस्तक्षेप करून याबाबत लवकरच ठोस उपाययजना करणार असल्याचे सांगितल्यानंतर पालक परतले.
शाळेला कुलूप ठोकणार
संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी रजीनामा देणे शाळा अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला बेमुदत काळासाठी कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उपसरपंच नितीन इंगळे यांनी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व अन्य विभागात निवेदन दिले आहे.