वर्ष उलटले तरी तपास ठप्प, जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना पत्र, अहवाल सादर करण्याचे आदेश
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस आधारकार्ड, मोबाईल नंबर आधारे बोगस नव मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न निवडणुक आयोगाने हाणून पाडला होता मात्र या प्रकरणात आरोपी व ‘मास्टर माईंड’ कोण हे अद्याप समोर आले नाही. गुन्हा नोंद होऊन जवळपास 1 वर्ष होत आले तरी तपासात विशेष काही प्रगती झालेली दिसत नाही. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पोलिस अधीक्षक यांना पत्र काढून कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्यातील तपास व पुढील कार्यवाही जलदगतीने करण्यासाठी आपल्या स्तरावर निर्देश द्यावे असे त्यात नमुद आहे.
‘व्होटर हेल्पलाईन’ या अँपच्या माध्यमातुन जवळपास 6 हजार 200 पेक्षा अधिकची नावे फॉर्म नंबर 6 भरून नाव नोंदणी करण्यात आली मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने ‘डाव’ फसला. निवडणुकीत तोतयेगिरी करण्याचा प्रयत्न करून केंद्रीय निवडणुक आयोगाची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हणटले आहे. गुन्हा नोंद करून निवडणूक आयोगाने सोपस्कार पुर्ण केले आहेत.
2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात व्होटर अँपचा वापर करून मोठ्या प्रमाणात मतदार नाव नोंदणी करण्यासाठी अर्जाची नोंदणी करण्यात आली. हे अर्ज दाखल करताना बोगस अस्तित्वात नसलेले आधार कार्ड वापरण्यात आले, मोबाईल नंबर, फोटो व पत्ते वापरून वेगवेगळ्या गावात अर्ज दाखल करण्यात आले, ते अर्ज बीएलओ स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित होते मात्र प्रशासन वेळीच सतर्क झाल्याने बोगस मतदार नोंदणीचा डाव हाणून पाडला गेला आहे. ‘संघटीत गुन्हेगारी’ सारखा हा प्रकार असुन याचा ‘मास्टर माईंड’ शोधणे गरजेचे आहे.

फोटो एकच मात्र नाव व आधार क्रमांक वेगवेगळे वापरण्यात आले आहेत. एक मुलीचा फोटो एकच आहे मात्र एका आधार कार्डवर छाया सुनील पवार, बेंबळी गावचा पत्ता तर दुसऱ्यावर पुनम चव्हाण आरळी खुर्द तुळजापूर येथील पत्ता आहे. हा दोन्ही आधार कार्डचे नंबर वेगवेगळे असले तरी एनरोल नामांकन नंबर हा 4892/89659/414 हा सारखाच आहे. हाच एनरोल नंबर जवळपास हजारो आधार क्रमांक यांना वापरला आहे. आधार नंबर वेगवेगळे असुन ते अस्तित्वात नाहीत. सर्व आधार कार्डवरील दिनांक 23 मे 2019 असुन डाउनलोड व जारी केलेली दिनांक एकच आहे.

विशेष म्हणजे बोगस नोंदणी अर्ज दाखल केलेले पैकी काहीजण परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येत आहे.सत्यपाल, कपूर,अय्यर,खंडेलवाल अशी नावे आहेत. हंगरगा येथील दाखल गुन्ह्यात व नंतर चावडी वाचनात समोर आलेली जवळपास 6 हजार 200 अर्ज, कागदपत्रे निवडणुक आयोगाने पोलिसांकडे तपासासाठी दिली आहेत. एका लॉगिनवरून जास्तीत जास्त 5 अर्ज ऑनलाईन भरता येतात म्हणजे जवळपास दीड हजार सिमकार्ड वापरण्यात आले त्यातुन एकाही व्यक्तीपर्यंत पोलिसांना पोहचता आले नाही, हे विशेष.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी रोखठोक स्पष्ट भुमिका केली असुन या प्रकरणात संबंधित विभाग चौकशी करीत असुन चौकशी व्हावी यात काही दुमत नाही. हा विषय योग्य पद्धतीने हाताळला गेला पाहीजे असे सांगत त्यांनी ‘पाठपुरावा’ करणार असल्याचे संकेत दिले, आमदार यांच्या कडक भूमिकेनंतर यात ‘ठोस’ कारवाई होईल अशी ‘आशा’ सामान्य जनतेत पल्लवीत झाली होती मात्र तरी देखील काहीही झाले नाही, त्यांनाही प्रशासनाने दाद दिली नाही.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात 294 मतदान केंद्रावर हा प्रकार घडला असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. पोलिसांवर दबाव असुन राजकीय दबावाखाली कोणत्याही आरोपीवर अद्याप कारवाई केली नाही, पोलिस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.खुद्द आयोगालाच न्याय मिळेना असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करावा अशी मागणी त्यांनी केली मात्र पुढे काही विशेष झाले नाही. राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग यावर काही कारवाई करणार आहे की नाही याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी अशी मागणी ओमराजे यांनी केली.
तुळजापूर मतदार संघात हंगरगा, रुईभर व सिंदफळ, काटीसह इतर गावातील कनेक्शन सेम असुन आधार एनरॉलमेंट नंबर सारखेच आहेत. हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक सिंदफळ, रुईभर, काटी व इतर गावात वापरण्यात आले आहेत त्यामुळे या ठिकाणसह अन्य भागात एक मोठे रॅकेट असल्याच्या बाबीला पुष्टी मिळात आहे.
सिंदफळ, रुईभर व इतर 100 ठिकाणी वापरण्यात आलेले आधार कार्डचे नंबर अस्तित्वात नसुन सगळ्यांची वेळ व नंबर एकच आहे.आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी,ज्येष्ठ नागरिक यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर स्थानिक गावचा पत्ता दाखवला होता, जो की चुकीचा असुन ते स्थानिक रहिवासी नाहीत. बीएलओ व त्यांची टीमने पाहणी केल्यावर ते पत्त्यावर राहत नसल्याने निवडणुक आयोगाने अर्ज नामंजूर केले.
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील हंगरगा गावातील बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 172,3(5),318(2),335,336(2),336(3),340(2)61(2) व 62 अन्वये 17 ऑक्टोबर 2024 रोजी गुन्हा नोंद केला.