धाराशिव – समय सारथी
तुळजापूर यात्रा मैदान जागा हडप प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानुसार कारवाईची दिशा व दोषीवर जबाबदारी निश्चित करण्यासाठीची जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली असुन 14 ऑक्टोबर रोजी मंगळवारी पुढील बैठक होणार आहे. उपविभागीय अधिकारी,भुमी अभिलेख, नगररचना, नगर पालिका प्रशासन अधिकारी, जिल्हा निबंधक यांसह अन्य विभागाच्या अधिकारी यांना समितीने कार्यवाही करून त्यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्यास सांगितले आहे. जिल्हा शासकीय अभियोक्ता यांचा कायदेशीर सल्ला घेऊन पुढील दिशा ठरणार आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी यात लक्ष घातल्यानंतर या प्रकरणाला गती आली आहे.
चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. या समितीत उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी ओंकार देशमुख सचिव, उपाध्यक्ष उपजिल्हाधिकारी निवडणुक शिरीष यादव, सदस्य म्हणुन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख, जिल्हा सहनिंबधक, सहाय्यक नगर रचनाकार व उपायुक्त नगर परिषद प्रशासन त्रिंबक डेंगळे पाटील हे सदस्य आहेत. 27 वर्षापुर्वीच्या या महाघोटाळ्याला चौकशी अहवालामुळे वाचा फुटली आहे.
पदाचा गैरवापर करून व नगर परिषदेवर दबाव टाकून कारवाई होऊ दिली नाही असा आरोप माजी उपनगराध्यक्ष पंडीत जगदाळे यांच्यासह अन्य जणांवर तक्रारदार यांनी केला आहे. रेखाकन नकाशे, अकृषी व बांधकाम परवाने, खरेदी विक्री खत करणारे तत्कालीन नगर परिषद, भुमी अभिलेख, मुद्रांक विभागातील अधिकारी, काही बाबींना मंजुरी दिलेले नगर परिषदेतील तत्कालीन काहो पुढारी व अधिकारी कारवाईच्या रडारवर आहेत.
भुसंपादन निवडा, प्रक्रिया पार पडली का ? यासह संचिका व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत, चौकशी समिती पुढे भुसंपादन संचिका सादर केली नव्हती हे विशेष त्यामुळे संचिकेत दडलंय तरी काय ? हे अहवालानंतर कळणार आहे. नगर परिषदेचे आरक्षण व त्याची सद्य स्तिथी, लेआउट, खरेदीखत दस्त, जागेवर सध्या काय काय आहे, ताबा, बांधकामे, नगर परिषदेने दिलेले बांधकाम परवाने, केलेल्या नोंदी याचा अहवाल मागवला आहे.
गुन्हा नोंद करण्यासाठी अधिकारी प्राधिकृत करणे, तत्कालीन शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांची नावे, कार्यकाळ निश्चित करून नावे अंतीम करणे, कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंद करणे. यात्रा मैदान जागेचा ताबा, झालेले खरेदी विक्री दस्त कोर्टातून रद्द करणे, जागेवर अतिक्रमण असेल तर ते काढुन घेणे यासह अन्य बाबीवर अभिप्राय आल्यावर निर्णय होणार आहे. बोगस दस्तासह काही प्रकरण थेट फौजदारी कारवाईशी संबंधित असुन काही बाबी ह्या दिवाणी स्वरूपाच्या आहेत.
माजी उपनगराध्यक्ष पंडीत जगदाळे, हरिश्चंद्र जगदाळे, गंगाधर चव्हाण यांच्यासह 27 जणांवर बनावट दस्ताऐवज, खोटे निवेदन व शपथपत्र, शासनाचे आर्थिक नुकसान, दिशाभुल व फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. यात्रा मैदान जागा हडप करून त्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम, पत्र्याचे गाळे अर्थात अतिक्रमण काढून टाकून जागा पुनःश्च शासनाच्या ताब्यात घेणे, 27 जणांकडुन शासनाच्या नुकसान भरपाईपोटी 39 कोटी वसुल करणे, सदर वसुलीसाठी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून बँक खाती गोठवणे, या जागेच्या बाबतीत केलेली सर्व खरेदी खत रद्द करणे अशी मागणी तक्रारदार नेप्ते व यादव यांनी केली आहे.
तुळजापूर नगर परिषदेने यात्रा मैदानासाठी सर्वे नंबर 138 मधील 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन संपादीत केली मात्र ती जागा हडप केल्याचे व विक्री केल्याचे चौकशी अहवालातुन समोर आले आहे. तुळजापूर येथील यात्रा मैदान जागा हडप केल्याची तक्रार संभाजी शिवाजीराव नेप्ते व किरण माणिकराव यादव यांनी केली होती, त्यानुसार तहसीलदार अरविंद बोळंगे अध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार सचिव व सदस्य मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी अशोक भातभागे यांनी चौकशी अहवाल दिला आहे. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अमोल शिवाजीराव जाधव यांनी देखील आवाज उठवत कारवाईसाठी पाठपुरावा सुरु केला आहे.