भोपे पुजारी मंडळाचा विरोध, आक्रमक भुमिका, जिल्हाधिकारी यांना निवेदन
धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यात बसवण्यात आलेल्या चांदीच्या प्रभावळ व त्या प्रभावळ वरील नावाच्या प्रकाराला पुजाऱ्यांनी विरोध केला आहे. आई तुळजाभवानी चरणी अर्पण.. सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील असे नाव त्या चांदीच्या प्रभावळवर कोरलेले आहे. या प्रभावळ व नावाच्या प्रकाराला भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर कदम यांनी विरोध केला असुन जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांना तसे निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. अर्चना पाटील ह्या मंदीर संस्थानचे विशवस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. प्रभावळ ही नियमानुसार असावी व त्यावर कोणाचे नाव नसावे अशी भुमिका भोपे पुजारी मंडळाची आहे. तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु असुन देवीची मुर्ती शेजघरात निद्रेस असल्याने सिंहासन रिकामे आहे, हीच वेळ साधत प्रभावळ बसवली आहे.
जगतजननी श्री तुळजाभवानी माता ही समस्त सनातनी हिंदूंची कुलस्वामिनी असून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या घराण्याची कुलदैवत आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर तसेच मुख्य गाभारा अत्यंत पुरातन असून या सर्व बाबी अत्यंत संवेदनशील आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिरातील सर्व पुरातन वास्तूंचे जतन तथा संवर्धन करण्याचे काम मागील काही दिवसांपूर्वी सुरू झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तुळजाभवानी मातेच्या मागील जुनी चांदीची प्रभावळ काढण्यात आली व त्यानंतर ती पूर्वीची प्रभावळ पुन्हा न बसवता नवीन प्रभावळ बसविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या नवीन व पूर्वीच्या प्रभावळमध्ये खूप असमानता आहे.
मुख्य गाभाऱ्याची आदर्श आचारसंहिता यामुळे भंग पावू शकते. यास कारण की, नूतन प्रभावळ मध्ये व्यक्तिशः नाव असून हे अशोभनीय आहे. मूलतः देवाचे प्रभावळ म्हणजे देवमूर्तीभोवती असलेले तेजस्वी वलय होय, जे तेजाचे प्रतीक मानले जाते, हे वलय देवाचे तेज व शक्ती प्रकट करते. सनातन हिंदू धर्मात मूर्तिपूजेमध्ये प्रभावळचा वापर विशेष करून केला जातो. प्रभावळ हे गाभाऱ्याची शुद्धता व पवित्रता दर्शवणारे प्रतीक मानले जाते.
प्रभावळ हे देवमूर्ती-सिंहासन गाभारा यांचे महत्त्वाचे एक अंग असून यास अनन्यसाधारण महत्व आहे. प्रभावळ हे एक श्री तुळजाभवानी मातेचे राजचिन्ह असून यामुळे गाभाऱ्याचे सौंदर्य ही वाढवते. या प्रभावळीवर धर्मशास्त्रानुसार केवळ श्री तुळजाभवानी मातेचे शास्त्रोक्त राजचिन्ह तथा प्रतीक असणे अनिवार्य आहे. जे की सिंह, सुर्यपुष्प, किर्तीमुख, नाग, श्री तुळजाभवानी मातेचे मंत्र.
सर्व धार्मिक बाबींचा विचार करून मुख्य गाभाऱ्याची धार्मिक आचारसंहिता, पावित्र्य, सौंदर्य याचा अभ्यास करून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने वैयक्तिक कोणाचेही नाव असलेले व अशास्त्रीय प्रभावळ बसवून वाद निर्मान करू नये अन्यथा सर्व देवी मातेच्या भक्तांच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर कदम यांनी दिला आहे.