धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांड खटल्यात 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असुन डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने उर्वरीत युक्तिवाद सादर केला जाणार आहे. मुख्य संशयीत आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने त्यांचे वकील भुषण महाडिक हे बाजु मांडत आहेत. 24,25,26, 29 व 30 सप्टेंबर त्यानंतर 1 ऑक्टोबर असे सलग 6 दिवस काही मुद्दे मांडल्यानंतर 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल वेळेत द्यावा असे आदेश दिल्याने सुनावणीला गती आली असुन हा खटला सुनावणीच्या अंतीम टप्प्यात आहे. डॉ पाटील यांच्या युक्तीवाद नंतर इतर 8 आरोपीचा युक्तीवाद सादर होणार आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी होत आहे. सरकार पक्षाच्या वतीने सीबीआय व तक्रारदार / याचिकाकर्ता आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने लेखी युक्तीवाद सादर केला आहे.
सीबीआयच्या वतीने ऍड एजाज खान, आनंदीदेवी निंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड तर डॉ पाटील वगळता इतर 8 आरोपीच्या वतीने ऍड नेहा सुळे ह्या बाजु मांडत आहेत. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री तथा तत्कालीन खासदार डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे. आरोपी पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार आहे, त्याने हा हत्याकांडाचा उलघडा केला आहे.
पवनराजे निंबाळकर यांची 3 जुन 2006 रोजी हत्या झाल्यानंतर त्याचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीआयडी त्यानंतर सीबीआयने केला. आनंदीदेवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने हा तपास 23 ऑक्टोबर 2008 रोजी सीबीआयकडे वर्ग केला त्यानंतर सीबीआयने 7 महिन्यांनी पारसमल जैन याची मुलगी वर्षा हिच्या पत्रानंतर 25 मे 2009 रोजी गुन्ह्याची उकल केली. हत्याकांडनंतर तब्ब्ल 3 वर्षांनी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना आरोपी करीत अटक केली.
पवनराजे हत्याकांड तपासात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा व सुपारी दिल्याचा गुन्हा निष्पन्न झाला होता त्याचा स्वतंत्र गुन्हा लातुर पोलिसांत नोंद असुन न्यायप्रविष्ट आहे, अनेक वर्ष हे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे. 2009 साली हत्येची सुपारी व कट रचल्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे या 3 आरोपी विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही.
माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे दुहेरी हत्याकांडात आरोपी आहेत.