आ डॉ तानाजीराव सावंत यांनी शासनाचा ताण कमी केला – मंत्री एकनाथ शिंदे
ग्रामीण भागाच्या दृष्टीने चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण झाली
1 हजार बेडच्या जम्बो कोविड केअर सेंटरला बार्शीत सुरुवात
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठा भार पडत आहे परंतू आ. प्रा. तानाजीराव सावंत यांनी शासनाची कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून बार्शी येथे १ हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करून ग्रामीण भागाच्या दृष्टीने या सेंटरच्या माध्यमातून अतिशय चांगली व्यवस्था निर्माण केली आहे तसेच शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेचेवर आरोग्य यंत्रणेचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी शासनाला एक प्रकारे मदत करून हातभार लावला असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात १००० खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटरचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि.७ मे रोजी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे सचिव तथा मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रा. तानाजीराव सावंत, आ. राजेंद्र राऊत, आ. ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री दिलीप सोपल, प्रा. शिवाजीराव सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामलताई वडणे, बार्शीचे नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, नगरपरिषदेचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, गौतम लटके, प्रशांत चेडे, भूम नगर परिषदेचे संजय गाढवे, बार्शीचे तहसिलदार सुरेश शेरखाने, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, डॉ. दिग्गज दापके, केंद्र समन्वयक विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की, बार्शी या ठिकाणी शिवसेनेचे आ. तानाजीराव सावंत यांनी सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सोय करण्यासाठी बार्शी येथे १ हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड मिळत नाहीत अशा तक्रारी यामुळे कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. तसेच या कोविड केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून महिला रुग्णांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फार मोठी अडचण दूर झाली असल्याचे सांगून ते म्हणाले की, या ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या ८ चाचण्या मोफत केल्या जाणार असल्यामुळे तात्काळ निदान होण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यामध्ये देखील मोठा फायदा होणार असून रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी योगाच्या प्रशिक्षित शिक्षकांची देखील या ठिकाणी टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तर हे सेंटर नैसर्गिक व मोकळ्या वातावरणात असल्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरी जाण्यासाठी याचा सर्वात मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आ.सावंत यांनी अशा प्रकारची व्यवस्था करून शासनाला हातभार लावण्याबरोबरच सहकार्य केले असून ग्रामीण भागातील रुग्णांची सर्वात मोठी असलेली अडचण दूर होणार असल्यामुळे ही व्यवस्था रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा देणारी ठरणारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पुरुष व महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था
या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पुरुष व महिला रुग्णांची स्वतंत्र सोय केली असून महिला रुग्णांसाठी १५० व पुरुष रुग्णांसाठी ८५० बेड्स उपलब्ध करुन दिले आहेत. विशेष म्हणजे स्वतंत्र एका रूममध्ये तीन रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी, म्युझिक थेरपी, स्नानासाठी गरम पाणी, योग प्राणायाम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कार्यरत
या कोविड केअर सेंटरमध्ये १८ तज्ञ डॉक्टर्स, ४२ नर्सेस व ८० स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांस भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना ठराविक वेळ निश्चित करण्यात आली असून शारीरिक सुरक्षित अंतरा बरोबरच त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच ऑक्सिजनयुक्त २ ॲम्बुलन्स उपलब्ध आहेत. रुग्णांना पौष्टीक व सकस नाष्टा, वेळचे जेवण, दोन वेळी चहा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आ.प्रा.सावंत आले रुग्णांच्या मदतीला धावून
आ. प्रा. तानाजीराव सावंत यांचे राजकारणा व्यतिरिक्त सामाजिक कार्य खूप मोठे असून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसून टाकण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिव जलक्रांती योजना राबवून पाणी अडवा व पाणी जिरवा हे प्रत्यक्ष कृतीद्वारे काम केल्यामुळे अनेक ठिकाणच्या ओसाड शेतीचे नंदनवन झाले आहे. तर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयास ५ ऑक्सीजन ड्युरा सिलेंडर उपलब्ध करून देऊन रुग्णांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तर बार्शी येथे १ हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा दिला आहे.
जलदुत ते आरोग्य दूत ठरले आमदार डॉ सावंत
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय आरोग्यविषयक सेवा विनामूल्य मिळाव्यात व महामारीची लाट थोपविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरची उभारणी आ. प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी केलेली आहे. याठिकाणी तज्ञ डॉक्टरांचे पथक, आरोग्य सेवक, पॅथ लॅबच्या माध्यमातून आठ प्रकारच्या आवश्यक चाचण्या, एक्सरे, औषधोपचार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, भूम, वाशी, परांडा तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माढा, करमाळा येथील रुगांना सहजपणे उपचार घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
शिवजल क्रांतीचे प्रणेते प्रा.डॉ.आ. तानाजीराव सावंत यांच्या सेवाभावी दृष्टीकोनातून आजपर्यंत अनेक क्रियाशील उपक्रम जसे सामुदायिक विवाह सोहळे, जलसंधारण योजना, बाळासाहेब ठाकरे शिवजल योजना, विविध सामाजिक उपक्रम, दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा, उसाचे प्रश्न यासारख्या अनेक उपक्रमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात आलेला आहे. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल या हेतूने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. या जम्बो कोविड केअर सेंटरमुळे अनेकांच्या कुटुंबाला आधार मिळणार आहे.