५ सिलेंडर घेऊन १४५ ऑक्सिजन बेडचे उद्घाटन ? हे बरोबर नाही
नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा पालकमंत्री गडाख यांच्यावर हल्लाबोल
सवंग प्रसिद्धीसाठी लोकार्पण – तुळजापूरकरांना आता सुविधा द्या
तुळजापूर – समय सारथी
पर्याप्त ऑक्सिजन पुरवठा व यंत्रणा नसताना पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी तुळजापूर येथील भक्त निवासच्या 145 ऑक्सिजन बेडचे लोकार्पण केले. 5 सिलेंडर घेऊन 145 ऑक्सिजन बेडचे उदघाटन करण्याच्या प्रकारावर तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी याची हल्लाबोल केला आहे व ऑक्सिजन पुरवठा व रुग्ण व्यवस्थेच्या अनेक मुद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सवंग प्रसिद्धीसाठी पालकमंत्री गडाख यांनी पुरेसा ऑक्सिजन साठा नसतानाही केलेल्या उदघाटनावर प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून टीका केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज तुळजापूर येथील १२४ भक्तनिवास येथील कोविड रुग्णालयात मंदिर संस्थांच्या मदतीने सुरू केलेल्या १४५ ऑक्सिजन खाटांचे लोकार्पण करण्यात आले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून १२४ भक्त निवासामध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते व पुढील गरज ओळखून गेल्या वर्षीच ऑक्सिजन पाईप लाईनच्या कामास सुरुवात केली होती परंतु दिवाळीमध्ये कोरोना लाट ओसरल्याने प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केले व उर्वरित काम प्रलंबित राहिले. दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन बेडची वाढती गरज लक्षात घेऊन प्रशासनाला सूचना देत काम पूर्ण करून घेतले. उपजिल्हा रुग्णालयाकडे डॉक्टर्स कमी असल्याने तेरणा मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्सची सोय करून ठेवली परंतु जिल्ह्यात ऑक्सिजन व सिलेंडर्सची कमतरता असल्यामुळे १२४ भक्त निवासातील ऑक्सिजन बेड सुरु करण्यात आले नव्हते परंतु आज केवळ सवंग प्रसिद्धीसाठी पुरेसे सिलेंडर व मुख्यतः पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसताना देखील १२४ भक्त निवासमधील ऑक्सिजन जोडणी केलेल्या १४५ खाटांचे लोकार्पण पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते करण्यात आले असा आरोप नगराध्यक्ष रोचकरी यांनी केला.
सिलेंडर उपलब्ध नसताना देखील हा फार्स कशासाठी हा प्रश्न तुळजापूर वासियांच्या मनात निर्माण होत आहे. या उदघाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तसेच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ धनंजय पाटील उपस्थित होते. पालकमंत्री यांच्यासह त्यांना देखील तुळजापूर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी याबाबत विचारणा केली परंतु त्यांना याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. १४५ रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय करण्यासाठी साधारणतः २०० जम्बो सिलेंडर्सची आवश्यकता आहे मात्र केवळ १० सिलेंडर देऊन लोकार्पण व उदघाट्नाचा सोपस्कार उरकण्यात आला, त्यातील ५ सिलेंडर्स देखील तात्पुरत्या स्वरूपात तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील आणण्यात आले आहेत. या १० सिलेंडरमध्ये फार तर ७ ते ८ रुग्णांनाच सौम्य प्रमाणात ऑक्सीजन मिळू शकतो. मग पालकमंत्री यांनी याचे लोकार्पण का व कशासाठी हाच प्रश्न नगराध्यक्ष रोचकरी यांनी उपस्थित केला आहे.
ऑक्सिजन बेड्चे लोकार्पण झाले असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यामुळे अनेक ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण भक्त निवासवर येतील, त्यांना काय सांगायचे हा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे किमान २०० सिलेंडर्स तातडीने उपलब्ध करून देण्याची नैतिक जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे व त्यांनी ते तातडीने उपलब्ध करून घ्यावेत,अशी आग्रही मागणी तुळजापूर वासियांच्या वतीने नगराध्यक्ष रोचकरी यांनी केली आहे.