धाराशिव – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद मिटलेला नसताना दुसरीकडे काही जणांनी निधी मिळवून देतो यासाठी तोडपाणी करून पैसे उकळले असल्याचे समोर आले आहे. पालकमंत्री यांची माझी ओळख आहे, जिल्हा नियोजन समितीत कामे मंजूर करून देतो असे सांगत तब्बल 6 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी धाराशिव पोलिसांनी एक जणाविरोधात गुन्हा नोंद केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी प्रशांत सतिश नाईकवाडी, वय 35 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी आरोपी गणेश सतिश चव्हाण, रा.पाथरुड ता. भुम जि. धाराशिव याच्या मोबाईलवर 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान 5 लाख 95 हजार टाकले. आरोपीने मंत्री महोदय व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री हे माझे ओळखीचे आहेत असे सांगुन गावातील केलेली कामे दाखवून जिल्हा नियोजन समिती मधून कामे मंजूर करुन देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
फिर्यादीस कोणतेही शासकीय काम मिळवून न देता फिर्यादी यांचे कडून वेळोवेळी एकुण 5,95,000 ऑनलाईन घेवून फिर्यादीची फसवणुक केली. व पैसे परत मागीतले असता जिवे ठार मारण्याची धमकी दिली. नाईकवाडी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 351 (2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस याचा तपास करीत आहेत.