धाराशिव – समय सारथी
मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव तालुक्यातील मौजे पाडोळी गाव मोठ्या संकटात सापडले.पावसाचे पाणी थेट घरात घुसल्याने नागरिकांचे अन्नधान्य, कपडे व घरगुती साहित्य पाण्यात भिजून गेले.या अचानक झालेल्या संकटामुळे गावातील 45 कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आणि त्यांना जिल्हा परिषद शाळा,पाडोळी येथे आश्रय देण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व तहसीलदार मृणाल जाधव यांनी शाळेत जाऊन सर्व कुटुंबांची भेट घेतली.अधिकाऱ्यांनी गावातील पाणी गेलेल्या घरांची तसेच घर पडझडीची पाहणी केली.
तात्काळ दिलासा म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळाला.
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या या तत्पर मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.“आम्ही संकटात आहोत,पण प्रशासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,हीच खरी दिलासा देणारी बाब आहे,”असे गावकऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी नागरिकांना आश्वस्त केले की, “प्रशासन तुमच्या प्रत्येक गरजेसाठी सज्ज आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य मदत देण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल.”