धाराशिव – समय सारथी
ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पाळीव जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला आहे.या पार्श्वभूमीवर नुकसानीचे तात्काळ व योग्य पंचनामे करून अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाने विशेष पावले उचलली आहेत.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी स्पष्ट केले की,या कामकाजात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही.आदेशित कामकाज वेळेत व सुयोग्य पद्धतीने पार न पाडल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिलेल्या आदेशानुसार, तालुकानिहाय मिळालेल्या अहवालांचे परीक्षण करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने होण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी म्हणून खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये अरुणा गायकवाड उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी, संज्ञा कांबे मुंढे सहाय्यक महसूल अधिकारी तथा सहाय्यक, नानासाहेब मुंढे महसूल सहाय्यक तथा सहाय्यक यांचा समावेश करण्यात आला आहे.
वरील अधिकारी शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करून पंचनामे तात्काळ सादर करण्यासाठी जबाबदार राहतील.तसेच त्यांना तालुकानिहाय अहवाल एकत्र करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नियमितपणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.