*कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस – या 11 केंद्रावर लस उपलब्ध*
*ऑनलाइन बुकींग करण्याची आवश्यकता नाही,थेट लसीकरण केंद्रावर मिळणार डोस*
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक 12 मे आणि 13 मे 2021 रोजी 11 लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. ही लसीकरण केंद्रे आहेत जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, कळंब, परांडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा अंतर्गत चिंचोळी हॉस्पिटल उमरगा, ग्रामीण रुग्णालय मुरूम, सास्तूर, लोहारा, तेर, वाशी आणि भूम अशी आहेत.
ज्या लाभार्थ्यांचा कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन किमान 28 दिवस पूर्ण झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना या लसीकरण केंद्रांवर दुसरा डोस दिला जाणार आहे. याकरिता लाभार्थ्यांना ऑनलाईन बुकींग करण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन ऑनस्पाॅट पद्धतीने त्यांचे व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लस देण्याबाबत कार्यवाही होणार आहे. लसीकरणाला जातेवेळी लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि पहिला डोस घेतला त्यावेळेसचे नोंदवलेले ओळखपत्र, तसेच प्रमाणपत्र अथवा मोबाईलवर प्राप्त झालेला मेसेज लसीकरण केंद्रांवर प्रक्रिया सुलभ होणे करिता सोबत बाळगावे. या लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार नाही, त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी या केंद्रांवर गर्दी करू नये. तसेच लस घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि शिस्तीचे व शांततेचे पालन करत लस घ्यावी असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.