सुत्रे पुन्हा आ तानाजीराव सावंत यांच्याकडे – कोरोना संकटात करणार वैद्यकीय मदत
सावंत घेणार पक्षीय आढावा – ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पचे काम युद्धपातळीवर
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे 12 मे व 13 मे या दोन दिवसात सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करून कोरोना परिस्थितीचा व नियोजनाचा आढावा घेणार आहेत. कोरोना नियोजनबाबत पक्षीय व शासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचा आढावा घेणार आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातुन काढलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे तसेच याबाबतचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना यातून प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यामुळे सावंत कोरोना संकटात पुन्हा एकदा सावंत यांच्याकडे पक्षाने सूत्रे दिली असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना अनेक वेळा पक्षाची भूमिका व महत्वाचे निर्णय हे सामनामधून जाहीर करते आणि तो शिवसैनिक यांच्यासाठी एक प्रकारचा पक्षादेश असतो त्यामुळे सामनातील भूमिकेला विशेष महत्व आहे. आमदार सावंत यांचा दौरा मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करून पक्षाने सूचक इशारा दिला आहे. कोविड काळात सावंत यांनी आरोग्य विषय सुविधा व मदत केल्याने उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात रुग्णांची सोय झाल्याने पक्षाने पुन्हा एकदा सुत्रे ही डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे दिली असल्याचे बोलले जात आहे. सावंत यांना मंत्रीपद न मिळल्याने मधल्या काही दुराव्याच्या काळात उस्मानाबाद व सोलापूर येथील काही लोकप्रतिनिधी व नेत्यांनी सावंत यांना चार हात लांब ठेवले होते मात्र पक्षाने आता पुन्हा एकदा सावंत यांच्या खांद्यावर कोरोना संकटात लढा देण्याची जबाबदारी दिली आहे.
*ऑक्सिजन प्रकल्प – दररोज 240 सिलेंडर निर्मिती*
आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखाना येथे स्वखर्चाने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करणार असून यासाठी त्यांनी 1 कोटी 26 लाख रुपये हे या कामासाठी नाशिक येथील एका कंपनीला ऍडव्हान्स दिले आहेत. याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आगामी एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यातुन दररोज 240 सिलेंडर ऑक्सिजन निर्मित होणार आहे, हा तयार झालेला ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी रुग्णांना देण्यात येणार असून या प्रकल्पामुळे ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा कमी होणार आहे. आमदार सावंत यांनी दुष्काळात वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची अनेक कामे केली होती त्यामुळे भूम परंडा वाशी भागातील सिंचन क्षेत्र वाढले होते त्याच प्रकारचे काम आमदार सावंत यांच्याकडून कोरोना संकटात जनतेला अपेक्षीत आहे. सावंत यांनी जम्बो सिलेंडर भेट, 1 हजार बेडचे जम्बो कोरोना सेंटर काढून या कार्याला सुरुवात केली असून त्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची भर पडणार आहे. जलदुत म्हणून ओळख असलेले सावंत त्यांच्या कार्याने वायूदूत ठरणार आहेत.
*सावंत यांचा 2 दिवशीय दौरा*
आमदार डॉ सावंत हे 12 मे बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेतील यात सकाळी 11.30 वाजता पंढरपूर शासकीय विश्रामगृहात बैठक, दुपारी 2 वाजता मोहोळ तर सायंकाळी सोलापूर येथे बैठक घेतली.
13 मे गुरुवारी 11.30 वाजता परंडा शासकीय विश्रामगृहात भूम,परंडा वाशी येथील पदाधिकारी बैठक, दुपारी 2.30 वाजता उस्मानाबाद शासकीय विश्रामगृहात कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथील पदाधिकारी बैठक घेऊन कोरोना बाबत स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी समस्या जाणून घेतली व त्यानंतर या अनुषंगाने दुपारी 4.30 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.या दौऱ्यानंतर कोरोना उपाययोजना बाबत काय केले पाहिजे याचा अहवाल ते मुख्यमंत्री याना देणार आहेत व त्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या आवश्यक उपाययोजना करणार आहेत.