धाराशिव – समय सारथी
हुंडयाच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धाराशिव येथील सत्र न्यायालयाने पतीसह सासू व सासऱ्याला दोषी ठरवित सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. धाराशिव येथील सत्र न्यायाधीश राहुल गुप्ता व अंतिम युक्तीवाद सत्र न्यायाधीश एस जी दुबे यांच्या न्यायालयात पार पडली. सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
फिर्यादी शाहूराज नामदेव सुरवसे (रा. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी राणी हिचा विवाह दिनांक 2 एप्रिल 2012 रोजी खेलबा आनंतराव ढेकणे (रा. जाधववाडी, ता. जि. धाराशिव) याच्यासोबत झाला. राणीला कांती नावाची मुलगी व वीर नावाचा मुलगा अशी दोन अपत्ये झाली. सुरुवातीला दोन वर्षे संसार चांगला झाला, मात्र त्यानंतर पती खेलबा आनंतराव ढेकणे, सासू शोभा ढेकणे, सासरे आनंतराव ढेकणे, चुलत सासरा बिरु ढेकणे, ननंद अमृता ढेकणे व दिर सुग्रीव ढेकणे यांनी लग्नात ठरल्याप्रमाणे एक तोळा सोने व पन्नास हजार रुपये आणावेत, असा तगादा लावून राणीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. तिला मारहाण करणे, उपाशी ठेवणे व वारंवार घरातून हाकलून देणे असे प्रकार सतत होत राहिले.
नातेवाइकांमार्फत समजावून सांगूनही छळ कमी न झाल्याने राणीने त्रासाला कंटाळून 25 जुलै 2016 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा कलम नोंद झाला. तपास पीएसआय जी एस गायकवाड यांनी करून आरोपपत्र दाखल केले.
पती खेलबा आनंतराव ढेकणे यास कलम 304-ब नुसार 9 वर्षे सक्तमजुरी, कलम 306 नुसार 5 वर्षे सक्तमजुरी व कलम 498-अ नुसार १ वर्ष सहा महिने सक्तमजुरी शिक्षा सुनावली. सासरे आनंतराव ढेकणे व सासू शोभा ढेकणे यांना कलम 304 -ब नुसार 7 वर्षे सक्तमजुरी, कलम 306 नुसार 6 महिने व कलम 498अ नुसार 1 वर्ष सक्तमजुरी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा आरोपींनी एकत्रित भोगावयाची आहेत.
चुलत सासरा बिरु ढेकणे, ननंद अमृता ढेकणे व दिर सुग्रीव ढेकणे यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. या खटल्यात कोर्ट पैरवीचे काम महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती कोठावळे व पोलीस कॉन्स्टेबल श्री. कुंभार (पो. स्टे. धाराशिव ग्रामीण) यांनी पाहिले.