धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी नाच व्हिडीओ प्रकरणात जर कोणाच्या ‘भावना’ दुखावल्या असतील तर प्रसिद्धी पत्रकाद्वारे ‘दिलगिरी’ व्यक्त करून वादावर ‘पडदा’ टाकला असली तरी तुळजापूर सांस्कृतीक नवरात्र महोत्सवाच्या अवाढव्य खर्चाबाबत ‘मौन’ बाळगले आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थान अर्थात तुळजाभवानी पुरग्रस्ताच्या मदतीला धावणार का ? या विषयाला मात्र जिल्हाधिकारी यांनी बगल दिली आहे.
एकीकडे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी यांचे संसार उघड्यावर आले असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे दोघे तुळजापुर नवरात्र सांस्कृतिक उत्सवात एका गाण्यावर नाचत ठेका धरताना दिसले. पुरस्तिथी असताना सांस्कृतीक कार्यक्रम सुरु असुन त्यात हा प्रकार असंवेदनशीलता व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन टीका झाल्यावर जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे ‘दिलगिरी’ व्यक्त केली आहे.
तुळजापूर सांस्कृतीक नवरात्र महोत्सवासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान जवळपास 8 कोटींचा खर्च करीत असुन यातील कलाकारांना लाखो रुपयांचे ‘मानधन’ दिल्याने ते ‘तुपाशी’ असुन शेतकरी मात्र ‘उपाशी’ आहे. मंदीर संस्थान जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का? स्वतः जिल्हाधिकारी व्यथा व स्तिथी पाहत असल्याने ते अध्यक्ष या नात्याने त्यांनी मंदीर संस्थानकडुन तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यात पूरग्रस्तांना मदत गरजेची असताना मंदिर संस्थांन भाविकांनी अर्पण केलेल्या करोडो रुपयांच्या पैशांचा मनमानी पद्धतीने अपव्यय करीत आहे. उर्वरित नवरात्र महोत्सव कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत करण्याची लोकप्रतिनिधीसह शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. जिल्हाधिकारी व प्रशासन या आपत्ती काळात करीत असलेल्या कामाबद्दल करावे तितके कौतुक कमी असुन त्यांच्या भूमिकेबद्दल तीळ मात्र शंका नाही परंतु अवाढव्य खर्चाचे काय ?
आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त आहेत, त्यांचा ‘शब्द’ हा धाराशिव प्रशासनात ‘प्रमाण’ मानत ‘गणला’ जातो. जीर्णोद्धार सह अनेक संकल्पना मंदीराच्या खर्चातुन होत आहेत. जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकरी यांना मंदीर संस्थानच्या निधीतुन मदत करण्यासाठी आमदार पाटील यांनी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे ‘शब्द’ टाकून ‘वजन’ वापरावे अशी मागणी शेतकरी करीत आहे. सांस्कृतिक महोत्सव प्रमाणे पूरग्रस्त मदत जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचा ‘अंकुश’ नसावा.
राज्य सरकारने महोत्सवाला ‘राज्य पर्यटन’दर्जा दिला असला तरी आर्थिक खर्चाची तरतूद केलेली नाही, थोडक्यात विना पैसा मदतीचा कार्यक्रम आहे. उत्सवाला इतर गैरवित्तिय सहकार्य मात्र पर्यटन संचालनालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल असे अद्यादेशात ‘आवर्जून’ नमुद केले आहे.
खासगी स्पॉन्सर व मंदिर संस्थांनच्या पैशातून सांस्कृतीक नवरात्र महोत्सव केला जात असुन याच महोत्सवातील संस्कृतीक कार्यक्रमातील जिल्हाधिकाऱ्यांचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर मोठी टीका झाली होती. यात ड्रोन शो सह इंडियन आयडॉल असे कार्यक्रम आहेत.
जिल्हाधिकारी यांचा खुलासा – “कर्तव्य आणि भक्तीची सांगड”
सांस्कृतिक महोत्सवात मंचावरील कलाकार यांनी मंदीर समितीचा अध्यक्ष या नात्याने मंचावर येण्याची आग्रहपुर्वक विनंती केली.सभागृहातील सर्व उपस्थितांना त्यांनी तुळजाभवानी देवीच्या स्तवनावर ठेका धरण्याची विनंती केली. आई तुळजाभवानी देवीच्या स्तवनामध्ये कोणीही तल्लीन होतो, जिल्हाधिकारी असलो तरीही मी एक भविक भक्त म्हणुन कलाकारांना प्रोत्साहन देणे हे माझे काम असुन ते मी पार पाडले, माझ्या या कृतीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला वाईट वाटत असेल तर मी व्यक्तीश त्याची दिलगिरी व्यक्त करतो अश्या शब्दात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी वादावर पडदा टाकला आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणाऱ्या परिस्थितीत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार काम करत आहेत. एकीकडे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत,तर दुसरीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवींजींचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू आहे.
या दुहेरी जबाबदाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मंदिर संस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतानाच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून बचाव व मदत कार्यातही आघाडी घेतली आहे असे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने म्हणटले आहे
“आई तुळजाभवानी देवीच्या कृपेनेच आम्ही ही जबाबदारी पार पाडत आहोत. जिल्ह्यातील जवळपास दोन हजार अधिकारी-कर्मचारी, NDRF, सेना व मंदिर प्रशासनातील कर्मचारी हे आपापल्या जबाबदाऱ्या सांघिक भावनेने पार पाडत आहेत. अनेक अधिकारी-कर्मचारी मागील चार-पाच दिवस घराकडे गेलेलेही नाहीत. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेनंतर जिल्हाधिकारी पुजार हे तातडीने आपत्तीग्रस्त भागात पोहचले.ज्या दिवशी उपमुख्यमंत्री,पालकमंत्री,आपत्ती निवारण मंत्री तसेच आरोग्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता जिल्हाधिकारी हे प्रत्यक्ष सोबत राहून पाहणी दरम्यान करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत होते.
मात्र,महोत्सवातील परंपरा व जबाबदारी लक्षात घेऊन ते अल्प वेळासाठी मंचावर गेले असता कलाकारांनी आग्रहाने त्यांना उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी बोलावले.“त्या क्षणी जिल्हाधिकारी म्हणूनच नव्हे,तर एक भाविक भक्त म्हणून देवीच्या स्तवनात सहभागी झाले.जर या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगीरी व्यक्त करतो,” असे जिल्हाधिकारी पुजार यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील या आगळ्या-वेगळ्या परिस्थितीत प्रशासनाचे सांघिक काम आणि जिल्हाधिकार्यांची समतोल भूमिका दिसून येत आहे.