पीक विमा घोटाळा – शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर विमा भरून मदत लाटली, गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर पीक विमा भरून त्याची रक्कम हडप करण्याचा प्रकार समोर आला आहे. पीक विमा घोटाळ्याचा हा नवीन पॅटर्न जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर समोर आणला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या असुन जिल्हाधिकारी यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनकरंजा येथील संदीप चत्रभुज थोरात या सीएससी (कॉमन सर्विस सेंटर) चालकाने धाराशिव तालुक्यातील सांजा या गावातील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा याच्या जमिनीचा पीक विमा परस्पर स्वतःच्या व प्रदीप चत्रभुज थोरात यांच्या नावाने भरला. मुळात या दोघांच्या नावाने या भागात शेती नसताना गट नंबर 535,627,349 व 628 मधील खरीप हंगाम 2022 चा पीक विमा भरला.
यावर्षी सांजा भागातील संबंधित शेतकरी पीक विमा भरायला गेले तेव्हा तो अगोदरच भरला असल्याने नाकारण्यात आला त्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे भेट घेऊन लेखी तक्रार केली. जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी याचे गांभीर्य ओळखत तात्काळ जिल्हा कृषी अधीक्षक माने यांना चौकशी व कारवाईचे आदेश दिले.
बीड येथील प्रशासनाकडे माहिती मागितली असता संबंधीत सेंटर हे थोरात याच्या नावाने असल्याचे समोर आले. त्यावर खुलासा मागवीला असता त्याने चुकून विमा भरल्याचे सांगितले मात्र जिल्हा कृषी अधीक्षक माने यांनी मागील वर्षाची माहिती विमा कंपनीकडे मागितली असता संदीप चत्रभुज थोरात याने त्याचा भाऊ प्रदीप चत्रभुज थोरात या नावाने मागील वर्षीचा याचं सांजा येथील पीक विमा भरला होता थोरात याने 15 हजार 255 रुपये पीक विमा परस्पर उचलला व शासन आणि विमा कंपनीची फसवणूक केली. थोरात याचे एक प्रकरण समोर आले असुन अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.