धाराशिव/परंडा –
परंडा तालुक्यातील वडनेर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, दोन वर्षांचा मुलगा आणि आणखी दोन सदस्य असे चारजण पहाटेपासून घराच्या छपरावर पाण्याने वेढले गेले होते. अन्न पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षेत हे कुटुंब जवळपास 18 तास अडकून पडले होते.
घटनेची माहिती मिळताच NDRF चे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. दोरीच्या साहाय्याने कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असतानाच ती दोरी झाडाला अडकली. जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे मोहिमेत अडथळा निर्माण झाला. अशा वेळी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर स्वतः घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावातील पोहण्यात तरबेज युवकांना सोबत घेतले व प्रत्यक्ष बचाव मोहिमेत उतरले. स्वतः पुढाकार घेत लाकडी दांडक्याच्या आधाराने ते वाहत्या पाण्यात उतरले. त्यांच्या धाडसी पावलामुळे गावकरी आणि जवानांचा आत्मविश्वास वाढला. अखेर त्यांनी दोरी अडकलेली जागा सोडवली आणि बचावकार्याला गती मिळाली.
सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर, अखेर संध्याकाळी ९ वाजता सर्व चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या थरारक मोहिमेत NDRF जवानांसोबत गावकऱ्यांनीही जीव धोक्यात घालून साथ दिली.
“एका कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात स्वतः सहभागी होता आले, हे माझ्यासाठी मोठा दिलासा आहे. त्या कुटुंबाला वाचवताना योगदान देता आले, हे मी माझे कर्तव्य मानतो. NDRF चे जवान आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार ओमराजे यांनी मानले. गावकऱ्यांनी या यशस्वी बचाव मोहिमेला खासदाराचे धाडस, तत्परता आणि जनसामान्यांशी असलेली बांधिलकी यांचे प्रतीक ठरल्याचे सांगत खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकरांचे मनःपूर्वक आभार मानले.