धाराशिव – समय सारथी
वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी बंद केल्यानंतर चोराखळी येथील महाकाली कला केंद्र नियमांचा भंग केल्याने व कायदा सुव्यवस्था बिघडल्याने परवाना कायमस्वरूपी रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे पाठवला आहे. महाकाली केंद्राचा परवाना बाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असुन सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवेळी पोलिसांचा अहवाल व शपथपत्र कोर्टात जिल्हाधिकारी मार्फत सादर केले जाणार आहे अशी माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी दिली. धाराशिवचा काही भाग कला केंद्रामुळे चर्चेत आहे.
महाकाली केंद्रात 2 गटात वाद झाला त्यातून जीवघेणा हल्ला झाला होता. महाकाली कला केंद्रातील सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि निता जाधव या 3 नर्तकी महिला उमरगा येथील अभिषेक कालिदास शिंदे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाच्या हत्येत आरोपी असुन पोलिसांनी अटक केली आहे तर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे. या सर्व बाबी महत्वाच्या ठरणार असुन याबाबतचे शपथपत्र छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दाखल केले जाणार आहे. त्यावर कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
कला केंद्राच्या नावाखाली चुकीचे प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत त्यांना टाळे लावा अशी रोखठोक भुमिका पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जाहीर केल्यानंतर पोलिस विभागाने ठोस कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी चुकीचे प्रकार करणाऱ्या कला केंद्र विरोधात मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली 3 पथकांनी कारवाई करीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी 5 कला केंद्रावर गुन्हे नोंद केले आहेत. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने कला केंद्र व तेथील गैरप्रकार समोर आणत पाठपुरावा केला आहे.
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी टाकलेल्या अचानक टाकलेल्या धाडीत काही बाबी व नियमांचा भंग केल्याचे समोर आल्याने भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीचे व्हिडिओ चित्रीकरण (इन कॅमेरा) केले असुन त्यात अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. महाकाली, पिंजरा, कालिका, गौरी कला केंद्रावर ग्रामीण पोलिस ठाण्यात 2 तर येरमाळा पोलिस ठाण्यात 3 गुन्हे नोंद केले आहेत. काही कला केंद्रावर संस्कृतीक कला सादर करण्यासाठी कला मंच नव्हता, एका खोलीत वेगवेगळी व्यवस्था / लावणी बैठक लावण्यात आली होती. अनेक वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आल्या होत्या, त्यात कला सुरु होती, अश्या बंद खोलीत कलेला परवानगी नाही.
5 कला केंद्राचे प्रस्ताव प्रलंबित – परवानगी अधिक बोर्ड
वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई व चोराखळी येथील महाकाली या बहुचर्चित वादग्रस्त कला केंद्रावर प्रशासन कारवाई कधी करणार हा प्रश्न विचारला जात आहे. कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे अंबिका कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी प्रस्ताव दिला आहे मात्र तो मंजुर केला नाही, असे असतानाही तुळजाभवानी व येडेश्वरी देवीच्या फोटोसह इथे सगळी सजावट करून हे कला केंद्र सज्ज झाले आहे. परवानगीपुर्वी इतकी हिम्मत व ‘विश्वास’ येतो कुठून ? हा प्रश्न आहे.
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे रेणुका कला केंद्रसाठी परवाना मिळावा म्हणुन येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी अर्ज केला आहे तर लोकनाट्य कला केंद्रसाठी बाबासाहेब गाठे व सोलापूर बाळे येथील अक्षय साळुंके, तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे चंद्राई कला केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी अरविंद गायकवाड, आळणी येथे प्यासा केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत.