धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद केल्यानंतर धाराशिव पोलिस ऍक्शन मोडवर आला असुन पोलिस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी चुकीचे प्रकार करणाऱ्या कला केंद्र विरोधात मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली 3 पथकांनी कारवाई करीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी 5 कला केंद्रावर गुन्हे नोंद केले आहेत.
कला केंद्राच्या नावाखाली चुकीचे प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत त्यांना टाळे लावा अशी रोखठोक भुमिका पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जाहीर केल्यानंतर पोलिस विभागाने ठोस कारवाईला सुरुवात केली आहे. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने कला केंद्र व तेथील गैरप्रकार समोर आणत पाठपुरावा केला आहे. स्थानिक महिला व सामाजिक संस्थानी दैनिक समय सारथीच्या सामाजिक उपक्रमास पाठिंबा दिला आहे.
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी टाकलेल्या अचानक टाकलेल्या धाडीत काही बाबी व नियमांचा भंग केल्याचे समोर आल्याने भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीचे व्हिडिओ चित्रीकरण (इन कॅमेरा) केले असुन त्यात अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. महाकाली, पिंजरा, कालिका, गौरी व साई कला केंद्रावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात 2 तर येरमाळा पोलिस ठाण्यात 3 गुन्हे नोंद केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत कला केंद्र मालकांना परवाना सादर करायला सांगितला. काही कला केंद्रावर संस्कृतीक कला सादर करण्यासाठी कला मंच नव्हता, एका खोलीत वेगवेगळी व्यवस्था / लावणी बैठक लावण्यात आली होती. अनेक वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आल्या होत्या त्यात काही नर्तिका कला सादर करीत होत्या, तिथे काही नियमांचा भंग केला गेला, हे कॅमेरात कैद झाल्यावर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे.
तुळजाई कला केंद्र येथे घटना घडली म्हणुन फक्त हे एक कला केंद्र नाही तर ज्या ठिकाणी कला केंद्राच्या नावावर चुकीचे प्रकार होत असतील ती तात्काळ बंद करून त्यांना कुलूप लावा असे पालकमंत्री सरनाईक यांनी आदेश दिले आहेत. लोक कला ही महाराष्ट्राची संस्कृती असुन त्याचा गैरवापर करत असेल तर त्याला बिलकुल माफी दिली जाणार नाही, ताबडतोब कारवाईचे आदेश त्यांनी दिले.











