गुन्हे अन्वेषणातील कर्तृत्वाची दखल, मोठी जबाबदारी स्वीकारणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे सुपुत्र आणि कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणुन ओळख असलेले अजित राजाराम टिके यांची नागपूर येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस अधीक्षक (SP) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे धाराशिवकरांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
अजित टिके यांनी आतापर्यंत गुन्हे अन्वेषण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. विशेषतः चौघा खुनाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड केल्याने त्यांच्या तपास कौशल्याची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री’ पदकाने गौरविले होते.
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि धाडसी निर्णयक्षमतेमुळे टिके यांची महाराष्ट्र पोलिस दलात एक कणखर अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आता अमली पदार्थविरोधी मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नागपूर व विदर्भातील वाढत्या अंमली पदार्थांच्या साखळीवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांचे काम निर्णायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.