पंचनामा – आमदार कैलास पाटील यांनी दिली जिल्हा रुग्णालयास अचानक भेट
रुग्णांचे हाल, अनेक असुविधा, औषधांचा तुटवडा तर अस्थीरोग व ब्लड विभाग बंद
लिफ्टची मोटार चोरीला – गर्दी असतानाही प्रकार घडला कसा, दडपण्याचा प्रयत्न
धाराशिव – समय सारथी
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी रुग्णांच्या तक्रारीनंतर धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट देत तेथील असुविधाचा पंचनामा केला जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधे, गोळ्या याचा तुटवडा आहे तर गेली अनेक वर्ष अस्तिरोग विभाग बंद आहे. रुग्णालयातील रक्त पेढी बंद असुन रुग्णालयात बसाविलेल्या लिफ्टची मोटार चोरीला गेली असल्याची धक्कादायक बाब समोर आली. जवळपास टनभर वजन असलेली मोटार चोरली कोणी ? कोणाचा हात यासह अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत.अनेक औषधे नसल्याने रुग्णाचे हाल होत असुन बाहेरून महागडी औषधे आणायला सांगितले जात आहे. जिल्हा रुग्णालय हे सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग केले असल्याने दोन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात धन्यता मानत आहेत.
ना पित्ताची ना तापाची गोळी, ना खोकल्याचे औषध अशी परिस्थिती आहे जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्याची. आमदार पाटील यानी अधिकाऱ्यांकडुन अडचणीची माहिती घेऊन या समस्या सोडविण्याची जबाबदारी स्विकारली. जिल्हा रुग्णालयाचे हस्तांतर जुन 2022 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. त्यानंतर तांत्रीक बाबी पुर्ण करण्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आमदार कैलास पाटील यानी घेत एकेका विभागामध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
पहिल्यांदा औषध वाटप काऊंटरकडे चक्कर मारली, तिथे पित्ताची, ताप, सर्दी, खोकला या किरकोळ आजावरील औषधातुटवडा दिसला. अनेक औषधासाठी नागरीकांना खाजगी दुकानाकडे जाण्यास सांगण्यात येत होते. जिल्हा नियोजन समितीकडुन जवळपास दोन कोटीच्या रक्कमेची तरतुद केली आहे. अजुनही त्याची प्रक्रिया पुर्ण न झाल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार पाटील यानी आजच प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना दिल्या.
अस्थिरोग विभागाची काही वेगळी परस्थिती नव्हती, ऑपरेशन थिएटरच बंद दिसले त्यावर आमदार पाटील विचारणा केली असता तिथे अशीच उत्तरे देण्यात आली. प्रस्ताव दिला असुन साधन सामुग्री मिळेल असे सांगण्यात आले. सीटीस्कॅन मशीन बंद असुन नागरीकांना बाहेर जावे लागत असल्याची स्थिती आहे. रक्तपेढी विभागामध्ये रक्त विलगीकरण करण्याची मशीन नादुरुस्त असल्याने तो विभागदेखील दूरुस्तीअभावी बंदच असल्याचे वास्तव पाहयला मिळाले.दोन अडीच महिन्यापासुन अशीच स्थिती आहे. अशाने नागरीक रुग्णालयाकडे येतील का? असा प्रश्न आमदार पाटील यानी विचारला.
हस्तांतरण प्रक्रियेला वर्ष उलटुनही वैद्यकीय शिक्षण विभागाकडुन लक्ष दिलेले नाही. या अक्षम्य दुर्लक्षाचा नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंत्री सध्या इतर कामामध्ये व्यस्त असुन सचिवांची भेट घेणार आहे. आमच्या सरकारच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले. ते सक्षमपणे चालले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणे हे माझं लोकप्रतिनिधी म्हणुन कर्तव्य आहे असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.