धाराशिव – समय सारथी
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी आणि पशुपालकाला शासनाकडून मदत मिळेल,” अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
धाराशिव तालुक्यातील वडगाव (सिद्धेश्वर) येथे पालकमंत्री सरनाईक यांनी भर पावसात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी वडगाव (सिद्धेश्वर) येथील शेतकरी भुजंग जानराव यांच्या दोन एकर सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेतली. परिसरातील पिकांच्या नुकसानीची माहिती गजेंद्र जाधव यांनीही यावेळी पालकमंत्र्यांना दिली.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महादेव आसलकर, तलाठी माधव कदम यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात अतिवृष्टी सुरूच असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ही कार्यवाही पूर्ण होताच तातडीने शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल आणि प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत पोहोचवली जाईल.”