धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव आता देशभरात प्रसिद्ध होणार असुन राज्य सरकारने ‘राज्य प्रमुख पर्यटन महोत्सवाचा’ दर्जा जाहीर केला आहे. शारदीय उत्सवला राजमान्यता मिळाली असल्याने आगामी काळात उत्सवाला वेगळे रूप, भाविकांना सुविधा, पर्यटन, संस्कृती वाढीस चालना मिळणार आहे. तुळजाभवानी भक्त व धाराशिवसाठी ही अभिमानाची बाब असुन यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.
राज्य दर्जा दिला असला तरी आर्थिक खर्चाची तरतूद किंवा त्याबाबत भुमिका सरकारने स्पष्ट केली नाही. इतर गैरवित्तिय सहकार्य मात्र पर्यटन संचालनालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल असे अद्यादेशात ‘आवर्जून’ नमुद केले आहे. ‘तुळजापूर नवरात्र उत्सव’ची संकल्पना मांडून ती राबवण्यासाठी 25 लाख ते 1 कोटी रुपया पर्यंतचे असे 7 कोटी रुपयांचे ब्रँड स्पॉन्सर शोध सुरु आहे. 8 ते 10 कोटींचा हा कार्यक्रम आहे. ठेकेदार, कंपनी यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जात असल्याने ते वैतागले आहेत. मान्यता दिली आता आर्थिक तरतूद द्या अशी मागणी होत आहे.
‘सक्षम’ अधिकाऱ्यांचे ‘गट’ नेमून त्यांना आर्थिक स्पॉन्सरशिप व इतर देणगीदार पकडन्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. काही ठेकेदार, कंपन्या ‘मदत’ स्वरूपात पैसे व वस्तु देण्यास तयार आहेत मात्र त्यांनी प्रशासनाच्या ‘कृपा’ आशीर्वादाची ‘अट’ टाकली आहे. सीएसआरच्या ‘गोंडस’ नावाखाली हे सुरु आहे. साहेबांनीचं ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याने गाडी ‘सुसाट’ असे म्हणत काही जणांनी विशेष प्रशासकीय ‘कौशल्य’ वापरण्यास सुरुवात केली आहे. वसुलीच्या मोहिमेचा पायंडा पडल्यास आर्थिक बदनामी होऊ शकते. संकल्पना उत्कृष्ट आहे मात्र आर्थिक तरतूद केल्यास ताण कमी होऊ शकतो.
राज्यातील पर्यटनाला चालना देऊन राज्यातील पर्यटनस्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी व प्रचलन करुन देशी विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत सन 2025-26 या वित्तीय वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाची दिनदर्शिकात समाविष्ट केले जाणार आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात विविध कार्यक्रम पर्यटन विभागाच्या अंतर्गत घेतले जाणार आहेत.
स्थानिक लोककला, लोकनृत्ये, आई अंबाबाईचे गोंधळी गीत, भारुड, जाखडी.सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ, भजन स्पर्धा, किर्तन. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर व युट्यूब चॅनेलवर प्रक्षेपण. धार्मिक विधीबरोबरच राष्ट्रीय व पातळीवरील सुप्रसिध्द
प्रादेशिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम.प्रबोधनपत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन. भव्य लोकसंगीत मैफल, 300 ड्रोनव्दारे नवरात्र थीम लाईट शो. विविध स्पर्धा आयोजित करुन त्यामध्ये जबाबदार व शाश्वत पर्यटन यावर चित्रकला व्याख्याने तसेच मॅरेथॉनचे आयोजन, पर्यटन संचालनालयामार्फत फॅम टूर्सचे आयोजन करणे. पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह,फेअर व इव्हेंट आयोजन केले जाणार आहेत.
स्पॉन्सर व इतर स्वरूपात आर्थिक मदत घेऊन इतर मदत करणे हे एक प्रकारे भ्रष्टाचाराला अधिकृत ‘मान्यता’ दिल्यासारखेच आहे. ठेकेदार यांच्याकडुन आज पैसे मागायचे उद्या त्यांच्यावर चुकले तर कारवाई करता येईना ना बोलता येईना. साहेबापुढे झुकुन ठेकेदारांना झुकवले तर ताठ मानेने वागता येईल का अशी चर्चा अधिकाऱ्यांच्या गोटात आहे.
नवरात्र उत्सव व्हावा यासाठी राज्य सरकार दरवर्षी नगर परिषदेला ‘यात्रा अनुदान’ देते त्यातून बॅरीगेटिंग, पाणी, सीसीटीव्ही इतर व्यवस्था होणे अपेक्षित आहे, त्यासाठी प्रत्येक बाबीला किती रुपये लागणार याचा मागणी प्रस्ताव दिला जातो. कामाचे स्वरूप, काय करायचे याचे नियोजन व मागणी केली जाते. यात्रा अनुदान अपुरे पडत असल्याचे सांगत भाविक व ठेकेदार यांच्या पुढे हात पसरले जात आहेत. यावर्षी 3 कोटी 75 लाख अनुदान आले आहे मात्र खर्च 8 कोटी आहे, मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठपुरावा करूनही ‘लाल फितीत’ अडकला आहे म्हणून ही ‘वेळ’ आमच्यावर आली असे काही अधिकारी सांगत आहेत.