यशस्वी पाऊल – उस्मानाबाद जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसची पाहिली शस्त्रक्रिया यशस्वी
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना संकटात उस्मानाबाद जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राने आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसची पाहिली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली असून येथील कान नाक व घसा तज्ञ डॉ सचिन देशमुख यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
एका 40 वर्ष वयाच्या रुग्णाला कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा त्रास झाला होता.रुग्णाचे गाल सुजून दात हलण्याचा त्रास होत असल्याचे लक्षणे सापडल्याने डॉ देशमुख यांनी वेळीच निदान केले. डॉ सचिन देशमुख यांनी रुग्णाच्या त्या अनुषंगाने तपासणी चाचण्या केल्यानंतर 25 मे रोजी तातडीने म्युकरमायकोसिसचे ऑपरेशन यशस्वी केले. नाकाच्या बाजूला असणाऱ्या मॅक्झिलरी सायनसवर शस्त्रक्रिया करून म्युकरमायकोसिसचे इन्फेक्शन काढुन टाकले. तातडीने शस्त्रक्रिया केल्याने मेंदू किंवा डोळ्याला किंवा या दोन्हीला होणारा धोका टळला आहे. रुग्णाची प्रकृती सध्या चांगली आहे.
अतिशय कमी उपलब्ध साधन सामग्रीत उस्मानाबाद सारख्या लहान शहरात डॉ सचिन देशमुख व डॉ व्यंकटेश पोलावर, भूल तज्ञ डॉ श्रीकांत बलवंडे आणि त्यांच्या टीमने म्युकरमायकोसिसचे यशस्वी ऑपरेशन केल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या यशस्वी शस्त्रक्रीयामुळे उस्मानाबाद येथील वैद्यकीय क्षेत्राने आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे यामुळे या आजारबाबतीत रुग्णांना दिलासा मिळला आहे. डॉ देशमुख हे इंडियन मेडिकल असोसिएशन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आहेत, कोरोना काळात उस्मानाबाद येथील डॉक्टर व त्यांच्या टीमचे कार्य महत्वपूर्ण ठरले आहे.