परदेशातून मार्गदर्शन – उस्मानाबादचे सुपुत्र बालरोग तज्ञ डॉ महेश कात्रे देणार युकेतून वैद्यकीय सल्ला
कोरोना संकटात लहान मुलांसाठी ही काळजी घ्या – लवकरच हेल्पलाईन सुरू करणार
उस्मानाबाद – समय सारथी
माणुस कितीही शिकून मोठा झाला, परदेशात गेला तरी त्याच्या मनात आपल्या गावाची ओढ व काळजी कायम असते आणि संकट काळात तर त्याला सतत आपल्या गावाच्या माणसांची व आप्तेष्टांची चिंता सतावत असते. कोरोना संकटात उस्मानाबाद येथील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती व मदत व्हावी या भूमिकेतून उस्मानाबाद येथील सुपुत्र व सध्या युके येथे असलेले प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ महेश कात्रे हे उस्मानाबाद येथील डॉक्टर यांच्याशी समनव्य साधत त्यांना वैद्यकीय सल्ला व माहिती देणार आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने उस्मानाबाद, उमरगा व तुळजापूर या 3 ठिकाणी लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल्स सुरू करण्यात येणार आहे व तेथील उपचारासाठी जिल्हास्तरीय डॉक्टरांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे त्यात डॉ कात्रे यांचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ महेश कात्रे हे लहान बालकांना उपचार करताना आवश्यक ती काळजी घेण्याबरोबरच नेमके कोणत्या स्वरुपाचे व कसे उपचार करावेत ? याची माहिती व सल्ला देणार आहेत. युनायटेड किंगडम अर्थात युके (इंग्लंड) येथे बाल रोगतज्ञ म्हणून कर्तव्य बजावित असलेले व मुळचे उस्मानाबाद शहरातील असलेले डॉ. महेश कात्रे यांची भूमिका व मदत या संकट काळात महत्वाची ठरणार आहे त्यामुळे अत्याधुनिक पध्दतीचे उपचार करण्यास मदत होणार आहे. डॉ कात्रे हे परदेशात गेले तरी त्यांनी अनेक माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्याशी त्यांची नाळ वेगवेगळ्या माध्यमातून कायम ठेवली आहे.
डॉ महेश कात्रे हे मागील दहा वर्षांपासून इंग्लंड व आर्यलंडमध्ये बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. इंग्लडमध्ये मागील सहा महिन्यांपासून लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण आढळून येत आहे. भारतामध्ये सुद्धा याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. आपण वेळीच याबद्दल उपाययोजना करायला हव्यात असे मत कात्रे यांनी इंग्लंडमधील अनुभवावरून सांगितले आहे त्यामुळे पालकांना योग्य ती काळजी घेता येईल. लहान मुलांमधील कोरोनाला MIS-C (Multisystem inflammatory syndrome in children) हे नाव देण्यात आलेल आहे. याचा अर्थ असा की, यामध्ये शरिरातील वेगवेगळे अवयवांना संसर्ग होतो. लहान मुलांमधील काही महत्त्वाची कोरोनाची लक्षणे असून यात अशक्तपणा, ताप 101 पेक्षा जास्त,डोळे लाल होणे, संपुर्ण शरिरावर पुरळ उठणे,श्वास घेण्यास त्रास व अंगदुखी आणि पोटात दुखणे याचा समावेश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, यामध्ये कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह देखील असु शकते. बऱ्याच वेळा यामध्ये लहान मुलांचा मागील एक ते दोन महिन्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क आलेला असतो किंवा मुल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर एक ते दोन महिन्यांनी हा आजार होऊ शकतो.
लहान मुलांनी आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या पालकांनी काळजी घ्यावयाची आहे. वरील लक्षणे आढळल्यानंतर त्वरित डॉक्टरचा सल्ला घेणे. नेहमी हॅण्डजेलचा वापर करणे.पालकांनी फेस मास्क वापरणे. फिजिकल डिस्टन्ससिंग पाळणे गरजेचे आहे.
इंग्लंडमधील अनुभव सांगताना डॉ कात्रे म्हणाले की इथे फार कमी मुलांना हा आजार होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका. योग्य उपचार पद्धतीने हा आजार बरा होतो आणि बालमृत्यूच प्रमाण तर अगदीच नगण्य आहे. मागील सहा महिन्यांत MIS – C मुळे आमच्या हॉस्पिटल मध्ये मृत्यू झालेला नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि योग्य ती काळजी द्या. औषधांची काळाबाजारी करणार्यांनी ती करू नये असे आवाहन त्यांनी केले तसेच सरकार व आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असेही डॉ कात्रे म्हणाले. उस्मानाबाद येथील रुग्णांना व पालकांना वैद्यकीय मदत झाली तर माझ्यासाठी ती बाब सर्वाधिक आनंदाची व अभिमानाची असेल असे ते म्हणाले, रुग्णांच्या सुविधेसाठी इंटरनेट , विडिओ कॉन्फरन्स यासह आधुनिक संपर्क माध्यमांचा प्रभावी वापर करणार असून लवकरच एक हेल्पलाईन सुरू करण्याचा मानस डॉ कात्रे यांनी व्यक्त केला.