धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जवळपास 6 कला केंद्र सुरु असुन 5 प्रस्ताव परवानगीसाठी दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने या कला केंद्राना परवानगी दिलेली नसताना त्यातील अंबिका कला केंद्र मात्र सज्ज झाले आहे. अंबिका कला केंद्राला परवाना नसताना देखील तिथे नावाचे बोर्ड लावुन इतर यंत्रणा सज्ज केली आहे. खास ग्राहकांसाठी शाही सोय करण्यात आली असुन परवानगी नसतानाही बोर्ड व वातावरण निर्मिती केली आहे. हे का केले ? याकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसते.
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे अंबिका कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी प्रस्ताव दिला आहे मात्र तो मंजुर केला नाही. तुळजाभवानी व येडेश्वरी देवीच्या फोटोसह इथे सगळी सजावट करण्यात आली आहे, जसे की प्रशासनातील कोणी यांना परवाना ‘पक्का’ देऊ असा ‘ग्रीन सिग्नल’ देत ‘शब्द’ दिला होता. धाराशिव जिल्ह्यातील वडगाव ज, आळणी, चोराखळी, पिंपळगाव या भागात ही कला केंद्र सुरु असुन आणखी 5 ते 6 कला केंद्र प्रस्ताव दिले असुन बांधकामे देखील अंतिम टप्प्यात आहेत.
धाराशिव जिल्ह्याचा विकास किती झाला हा संशोधनाचा विषय असला तरी या भागात कला केंद्र मोठ्या प्रमाणात झाली असुन कला केंद्रामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. काही कला केंद्रावर गैरप्रकार होत असल्याने स्थानिक ग्रामस्थ यांचा टोकाचा विरोध असुन ती बंद करावीत अशी मागणी होत आहे. नागरिक आक्रमक झाले असुन आंदोलनाचा इशारा देखील जिल्हाधिकारी यांना दिला आहे. परवान्यासाठी ग्रामपंचायत व पोलिस विभागाने कोणत्या आधारे नाहरकत दिली ? हे तपासणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी प्रशासनाकडे कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे रेणुका कला केंद्रसाठी परवाना मिळावा म्हणुन येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी अर्ज केला आहे तर लोकनाट्य कला केंद्रसाठी बाबासाहेब गाठे व सोलापूर बाळे येथील अक्षय साळुंके, तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे चंद्राई कला केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी अरविंद गायकवाड, आळणी येथे प्यासा केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत.