धाराशिव – समय सारथी
बीड येथील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नर्तकी पुजा गायकवाड ज्या कलाकेंद्रात कामाला होती त्या तुळजाई कलाकेंद्राचा परवाना वाशी तहसीलदार प्रकाश म्हत्रे यांनी जुन 2025 रोजी निलंबित(रद्द) केला मात्र त्या आदेशाला अवघ्या काही दिवसातच जिल्हाधिकारी कार्यालयातुन स्थगिती देण्यात आल्याने ते पुन्हा ‘थाटामाटात’ धुमधडाक्यात सुरु झाले. पिंपळगाव येथील तुळजाई सांस्कृतिक कला केंद्राला पाठबळ व अभय कोणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुजा गायकवाड हिची 3 दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार असुन तिला बार्शी येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. आत्महत्या घटनेपुर्वी उपसरपंच बर्गे हे नर्तकी पुजाला भेटायला तुळजाई कला केंद्रावर गेले होते याच ठिकाणी गेल्या वर्षभरात दोघांचे प्रेम व वाद टोकाला गेला होता त्यामुळे हे कला केंद्र व तेथील काही जन पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. हे कला केंद्र वादग्रस्त बनले असुन त्याच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. इथे हाणामारीसह अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम थोरात यांनी केंद्रात अचानक भेट दिली असता कला केंद्रामध्ये नियम व अटींचे पालन केले जात नसून, रात्री 1 वाजेनंतर लोकनाट्य कला केंद्र सुरू होते. कला केंद्राच्या वॉलकंपाउंडच्या आत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये देशी विदेशी दारू विक्री करण्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आली. कला केंद्रामध्ये पारंपरिक वाद्यांशिवाय डीजेचा वापर करीत असल्याचे नमूद केले आहे, त्यानंतर तहसीलदार यांनी परवाना रद्द केला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून स्थगिती देण्यात आली.
बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा गुन्हा नोंद आहे तर ही आत्महत्या नसुन घातपात असल्याचा त्यांच्या कुटुंबाचा आरोप आहे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. पुजाच्या आर्थिक व व्यावसायिक हालचालींची कसून चौकशी सुरु आहे.