जादा दराने खताची विक्री – तीन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित
उस्मानाबाद – समय सारथी
रासायनिक खताची सुधारीत दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने तुळजापूर व उमरगा परिसरातील तपासणी केली असता तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले.तिन्ही दुकानांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली.
कृष्णा एजन्सी तुळजापूर, लक्ष्मी कृषी सेवा केंद्र,उमरगा, विशाल कृषी एजन्सी, उमरगा या खत विक्री केंद्राने रासायनिक खताची सुधारीत दरापेक्षा जादा दराने विक्री केली असल्याचे आढळून आले.खत नियंत्रण आदेश 1985 मधील तरतुदीनुसार तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांचेकडे सादर करण्यात आला होता.त्यानुसार केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत.
जिल्ह्यातील खत विक्री केंद्राने शेतक-यांना जादा दराने विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र/गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलक/दरफलकावर नोंद न करणे इ. प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही श्री घाटगे यांनी दिला आहे.
शेतक-यांना निविष्ठा उपलब्धतेबाबत व दराबाबत काही अडचण/तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार देण्याचे तसेच 02472-223794 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.