तणावपुर्ण शांतता, गावकी पेटली – राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांच्या निषेधार्थ तडवळा बंद, पोलिस बंदोबस्त
पाटलांकडुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख – विरोध मोडण्यासाठी पाटलांची झुंडशाही
धाराशिव – समय सारथी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सचिव सुरेश पाटील यांनी एकेरी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पाटील यांचे गाव असलेल्या तडवळा येथे गाव बंद पुकारण्यात आला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पाटील यांच्या वक्तव्यानंतर गावकी पेटली असुन कडक पोलीस बंदोबस्तामुळे अनर्थ टळला. पाटील यांचा शिवप्रेमी यांनी विरोध केला.
पाटील यांच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनानी रस्त्यावर उतरून गाव बंदचे आवाहन केले होते त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी सुरेश पाटील त्यांच्या समर्थकासह रस्त्यावर उतरले यावेळी दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली. शिवप्रेमी गाव बंदचा आग्रह करीत होते तर पाटील व त्यांचे समर्थक त्याला विरोध करताना दिसले या दादागिरीमुळे तणाव वाढला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. शिवप्रेमीचा विरोध मोडण्यासाठी झुंडशाही दाखवत पाटील स्वतः त्यांच्या कार्यकर्तेसोबत रस्त्यावर उतरले.
सुरेश पाटील यांनी काल सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करीत अनावधानाने काही चुकीचे वक्तव्य शब्द आले असतील तर ते माघारी घेतो असे सांगत दिलगिरी व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केलीय विषय संपवा असा आग्रह व मनधरणी पाटील यांनी शिवप्रेमीना केली मात्र काही जणांनी गावकऱ्यासमोर जाहीर माफी मागा असे सांगताच त्यांनी माफी मागणार नाही असे म्हणत नकार दिला. माफी हा विषय प्रतिष्ठाचा बनल्याने दोन्ही गटांनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत शक्तीप्रदर्शन केले. पाटील यांच्या वक्तव्याने मात्र तडवळा गावात गावकीचे राजकारण यानिमित्ताने चांगलेच रंगले. राष्ट्रवादी पक्षाने अद्याप त्यांची भुमिका स्पष्ट केली नाही.
शरद पवार गटावर टीका करताना पाटील यांनी अरे काय करणार ‘छत्रपती’ त्याची तलवार कधी खाली यायची, तो घोड्यावरून केव्हा खाली उतरायचा” अशा भाषेत टीका केली होती.
वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असलेल्या सुरेश पाटील यांनी यापूर्वी देखील बेभान होत तोंडसूख घेतले आहे. अजित पवार व्यासपीठावर असताना त्यांनी राष्ट्रवादी संपली असे वक्तव्य केले तर मराठा आरक्षण विषयावर मंत्री तानाजीराव सावंत यांना भर चौकात उभे करुन मारू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.