विशेष मोहीम – उस्मानाबाद शहरात 5 दिवसात 18 केंद्रावर मिळणार लस
45 वर्ष वयोगटावरील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड – नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरात नगर परिषद क्षेत्रात 15 जुन ते 20 जुन या पाच दिवसात कोरोना लसीकरणाची प्रभाग निहाय विशेष मोहीम प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येणार आहे. शहरातील 18 ठिकाणी हे लसीकरण होणार असुन नागरी आरोग्य केंद्र व प्राथमीक शाळेत कोविशिल्ड लस दिली जाणार असुन समन्वय साधण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने 11 पर्यवेक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहराची लोकसंख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे शिवाय कोरोना रुग्णांची संख्या जास्त सापडत असुन आगामी काळात संसर्ग टाळण्यासाठी ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी दिली. 45 वर्षपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ही लस दिली जाणार आहे.
उस्मानाबाद शहरात विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी नगराध्यक्ष मकरंद राजे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली होती. उस्मानाबाद शहरात प्रभाग निहाय प्रायोगिक तत्वावर 5 दिवस लसीकरण होणार आहे त्यांनतर लस उपलब्धतानुसार व्यापक स्वरूपात मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना ही लस दिली जाणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेऊन 84 दिवस झाले आहेत त्यांना कोरोनाचा दुसरा डोस दिला जाणार आहे, लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्यास टोकन पद्धतीने लस दिली जाणार आहे तर 60 वर्ष वरील नागरिक व 45 वर्षवरील दिव्यांग नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. या लसीकरणबाबत शहरातील 10 नगरसेवक यांना लेखी पत्र देऊन कळविण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेत नागरिकांना सहभागी करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
प्राथमिक शाळा व आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने लागणारी यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्यासाठी पर्यवेक्षकाच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली.शहरात लसीकरणसाठी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.
15 जुन रोजी उस्मानाबाद शहरातील खाजा नगर येथील 14 नंबर शाळेत, तेरणा महाविद्यालयात, शांतिनिकेतन भागातील नगर परिषदेच्या 18 नंबर शाळेत लसीकरण होणार आहे. 16 जुन रोजी नगर परिषदेच्या गणेश नगर येथील शाळा क्रमांक 20, पोहनेर रोड वरील शाळा क्रमांक 23, सरस्वती विद्यालय बँक कॉलनी येथे, 17 जुन रोजी मौलाना आझाद शाळा,भाई उद्धवराव पाटील शाळा संभाजी नगर, उंबरे कोठा येथील शाळा क्रमांक 22 व भीम नगर येथील शाळा क्रमांक 8 तर 18 जुन रोजी भाजी मंडई काकडे कॉम्प्लेक्स, डॉ आखलाख दवाखाना,श्रीपतराव भोसले हायस्कूल व नुतन विद्या मंदीर शाळा येथे लसीकरण होणार आहे.19 जुनला आर्यचाणक्य महाविद्यालय, नगर परिषदेच्या सांजा रोड येथील शाळा क्रमांक 6 व रामनगर येथील शाळा क्रमांक 24 येथे कोरोनाची लस दिली जाणार आहे तरी नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजे यांनी केले आहे.