22 जुनपासुन ऑनलाईन व ऑफलाईन लस नोंदणी करता येणार
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यात आता प्रत्येक लसीकरण सत्र ठिकाणी ऑनलाइन आणि ऑनस्पॉट दोन्ही पद्धतीने नोंदणी उपलब्ध असणार आहे, 22 जुनपासुन हा नियम लागु होणार आहे अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दिली आहे.
केंद्र शासनाकडून कोविन पोर्टलमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार यापुढे आयोजित प्रत्येक कोविड लसीकरण सत्र ठिकाणी ऑनलाइन आणि ऑनस्पॉट या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने नोंदणी करणे शक्य होणार आहे. पोर्टलवर लसीकरण सत्र निर्माण करून प्रसिद्ध केल्यानंतर ऑनलाइन आणि ऑन स्पॉट या पद्धतीने नोंदणी करण्याकरिता दोन्ही करिता समान स्लॉट्स उपलब्ध असणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक 22 जून 2021 रोजी आणि त्यापुढे आयोजित केल्या जाणाऱ्या लसीकरण सत्रांकरिता ही सुविधा उपलब्ध असणार आहे. याकरिता मंगळवारी दिनांक 22 जून 2021 रोजी आयोजित लसीकरण सत्रांकरिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून स्लॉट्स बुक करणे करिता सोमवारी दिनांक 21 जून 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता स्लॉट्स खुले केले जाणार आहेत आणि यापुढे दररोज सायंकाळी पाच वाजता पुढील दिवशी आयोजित लसीकरण सत्रांमधील ऑनलाईन बुकिंग साठी चे स्लॉट्स खुले केले जाणार आहेत. ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करणे शक्य नाही, अशांकरिता समान क्षमतेने ऑन स्पॉट पद्धतीने नोंदणी सुविधा (म्हणजेच लसीकरण सत्र सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करून लगेच लस घेणे) देखील उपलब्ध राहणार आहे.