धाराशिव – समय सारथी
98 किलोच्या गांजा तस्करी प्रकरणी धाराशिव येथील कोर्टाने 3 आरोपीना 12 वर्षाच्या शिक्षेसह दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मीटकरी यांनी 3 आरोपीना शिक्षा दिली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी मांडलेला पुरावा व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीना शिक्षा ठोठावली. यात परंडा येथील मीना पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील 2 आरोपींचा समावेश आहे.
17 जून 2020 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की इनोव्हा क्रिस्टा कार क्र एमएच 25 एएल 9199 मधून नळदुर्ग ते सोलापूर महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होणार आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी सदर वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पंच व महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार अमित भारती हे यावेळी हजर होते.
18 जून 2020 रोजी पहाटे 2.45 वाजता अणदूर जवळील देशमुख वस्ती परिसरात वाहन अडवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान वाहनातून 5 पोत्यांमध्ये 19 लाख 59 हजार किमतीचा 97.96 किलो गांजा आढळून आला तसेच वाहतुकीसाठी वापरलेली 15 लाखांची इनोव्हा क्रिस्टा कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी बाळासाहेब दशरथ परबत रा. तडवळे (म), ता. माढा, जि. सोलापूर सोमनाथ दत्तात्रय कदम रा. कदम वस्ती, कान्हेरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले.
गुन्हा घडते वेळी आरोपी मिना उर्फ मिनाताई दिलीप पाटील ही सोबत असल्याचे सीडीआर, व टॉवर लोकेशन वरुन निष्पन्न झाले.मीना पाटील हिचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला अटक करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून 15 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. ऍड देशमुख यांनी मांडलेले सर्व पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20(क) व 29 अन्वये दोषी धरून शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक जगदीश नवनाथ राऊत, सहा. पोलीस निरीक्षक एस. पी. चव्हाण यांनी केला. पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांचे यात मार्गदर्शन मिळाले. 2020 साली झालेले हे गांजा तस्करी प्रकरण राज्यभर गाजले होते त्यात आरोपीना शिक्षा आल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.












