दाऊतपूर येथील शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल – सोयाबीन पाण्यात कुजून दुर्गंधी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात 26 व 27 सप्टेंबर या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 8 दिवस उलटले तरी शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहे. सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचे दौरे झाले व महसूल विभागासह विमा कंपन्यांचे पंचनामे झाले तरी शेतकऱ्यांना मदत दिली नाही त्यामुळे आता मदत मिळणार कधी ? हा संतप्त सवाल उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथील शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर,ढोकी,इर्ला,दाऊतपूर यासह कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकासह जनावरे मयत झाली तर अनेक घरांची पडझड झाली. दाऊतपुर येथे अनेक जण पाहणी करून गेले मात्र प्रत्यक्षात मदत मात्र मिळाली नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ७३७ गावांमध्ये ही पैसेवारी ५० पैशाच्या आत आली आहे. महसूल विभाग जर वर्षी ३० सप्टेंबरला हंगामी पैसेवारी जाहीर करते त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील 737 पैकी 362 खरीप व 375 रब्बी गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावांची सरासरी पैसेवारी 47.73 टक्के आहे.अतिवृष्टी झालेल्या उस्मानाबाद, परंडा व कळंब तालुक्याची खरीप हंगामी पैसेवारी 47 पैसे आहे. पैसेवारी 50 पेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा व शासकीय मदत मिळण्याच्या आशा आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात 27 व 28 सप्टेंबर या 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसुल विभागाने तयार करून सरकारकडे पाठविला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मदतीकडे मोठ्या आशेने नजरा लागल्या आहेत. हा प्राथमिक अंदाज असून यापेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाले असुन पंचनामे व पाहणी सुरू आहे. शेती,रस्ते,जनावरे,घरांची पडझड झाली असुन पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हात तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे.शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असुन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असले तरी मदत लवकर मिळाली तरच खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा मिळणार आहे.केंद्र व राज्य सरकारने एकमेकांकडे बोट न दाखविता व राजकारण, आरोप प्रत्यारोपात वेळ वाया न घालता भरीव मदत करणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असुन अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे.या अतिवृष्टीचा फटका 2 लाख 88 हजार 137 शेतकऱ्यांना बसला असुन 2 लाख 66 इतक्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 146 कोटी 35 लाख 46 हजार 200 रुपये इतका निधी अपेक्षित आहे. पुरामुळे अनेक गावातील रस्ते महामार्ग खराब झाले असून 134 किलोमीटर मार्गाचे नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी 51 कोटी 71 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.