धाराशिव – समय सारथी
तुळजापुरात विक्री करता येणारे ड्रग्ज हे मुंबईतुन आले असुन त्याचे मुंबई कनेक्शनसमोर आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपीना धाराशिव येथील कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुळजापुरात विक्रीसाठी येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. हे ड्रग्ज हे मुंबई येथील एका महिलेकडुन आणले असल्याची कबुली आरोपीनी दिली असुन हे ड्रग्ज कोणाला विकले जाणार होते ? ड्रग्ज खरेदी करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत. गेल्या काही वर्षापासुन तुळजापूर व परंडा येथे ड्रग्ज विक्री सुरु आहे. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी म्हणुन आमदार राणाजगजीतसिंह पाटील व डॉ तानाजीराव सावंत यांनी भुमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. तुळजापूर व परंडा यासह ग्रामीण भागात तरुण व्यसनाच्या आहरी गेला असुन गुंडाना राजाश्रय मिळत आहे. तुळजापुरात तर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या व्यसनाच्या आहरी गेल्या असुन त्यांचे चेले तस्करीत गुंतले आहेत. परंड्यात तर काही गँग यात ‘मस्त’ झाल्या असुन त्यांनी ‘बस्तान’ बसविले आहे. इंजेक्शन, गोळ्या आदी स्वरूपात ड्रग्ज विक्री केली जात आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज माफिया विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली असुन गोपनीय माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली, पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर व परंडा या 2 ठिकाणी एमडी ड्रग्ज मिळत असुन येथे अनेक तरुण व्यसनाच्या आहरी गेले आहेत. तुळजापूर व परंडा येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत असुन अनेक पेडलर सक्रीय आहेत, राजकीय वरदहस्तामुळे येथे ड्रग्ज चांगलेचे रुजले आहे. तुळजापुरात तर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या व्यसनाच्या आहरी गेल्या असुन त्यांचे चेले तस्करीत गुंतले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व त्यांचे पथक हे तुळजापूर उपविभागात गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम अमली पदार्थ विक्रीकरिता तुळजापूर येथे येणार आहेत. तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर तुळजापूर महामार्गावर गस्त केली असता तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटर कार संशयितरित्या थांबलेली दिसून आली. कारमध्ये तीन इसम बसलेले दिसून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचेकडे एमडी हा अम्ली पदार्थ असल्याचे सांगितले. त्यांनी एमडी हा अमली पदार्थ मुंबईतून तुळजापुरात विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी अमली पदार्थ व गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल असा 10 लाख 75 हजार रुपयांचा किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तुळजापूर येथे राहणारे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड यांना अटक केली आहे. सपोनी कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा, धाराशिवचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने केली आहे.