धाराशिव – समय सारथी
भीक मागायला लावण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या एका टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला असुन तुळजापूर येथील 5 आरोपीना अटक केली असुन एका महिलेचा समावेश आहे . या टोळीने कात्रज परिसरातुन 2 वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण केले होते, भारती विद्यापीठ पोलिस पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुरडीची सुखरूप सुटका केली.
कात्रज ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्यानचे 140 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी याचा छडा लावला. या टोळीला पकडून देण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे व त्यातील अंमलदार समाधान वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वाघमारे यांचे पुणे शहर पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी नाव घेत विशेष कौतुक केले. या टोळीने आजवर किती बालकांचे अपहरण केले व त्यांना कुठे कुठे भीक मागायला लावली याचा तपास पुणे पोलिस करीत आहेत.
पोलिसांनी सुनील सिताराम भोसले (वय 51), शंकर उजण्या पवार (वय 50) शालुबाई प्रकाश काळे (वय 45) गणेश बाबू पवार (वय 35) मंगल हरफुल काळे (वय 19) या 5 जणांच्या टोळीला अटक केली आहे. हे सर्वजण तुळजापूर तालुक्यातील मोतीझारा येथील रहिवाशी आहेत. धनसिंग हनुमंत काळे यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती
फिर्यादी काळे हे कात्रज येथील वंडरसिटीजवळ झोपडीवजा घरात राहतात. त्यांना चार मुले आहेत. यातील दोन वर्षाच्या दोन जुळ्या मुली आहेत. 25 जुलैच्या रात्री ते गाढ झोपेत असताना त्यांच्या दोन वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. मध्यरात्री जाग आल्यानंतर धनसिंग यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी झोपेतून मुलीला पळून नेल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने पीडित मुलीचा शोध घेण्याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथक आणि अंमलदार यांच्या दोन टीम तयार केल्या. याशिवाय गुन्हे शाखेने देखील पथक स्थापन करून तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान वंडर सिटी परिसरातील सीसीटीव्हीत दुचाकीवर तिघेजण या चिमुरडीला घेऊन जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी कात्रज ते पुणे रेल्वे स्टेशन दरम्यानचे 140 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पुणे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या तिघांव्यतिरिक्त आणखी दोघे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची ओळख पटवून माहिती घेतली असता सर्वजण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी असल्याची माहिती भारती विद्यापीठ तपास पथकाला मिळाली.
त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व अंमलदार आणि गुन्हे शाखेचे एक पथक अशी दोन पथके तुळजापूर या ठिकाणी गेले. त्यानंतर धाराशिव पोलिसांच्या मदतीने सुरुवातीला तीन आरोपी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अपहरण झालेली चिमुरडी सुखरूप सापडली. त्यानंतर अधिक चौकशी करत इतर दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी भीक मागण्यासाठी या चिमुरड्या मुलीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले.