धाराशिव – समय सारथी
प्रसिद्ध भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांना मारहाण केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असुन हे आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील आहे. मडके यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गळ्यातील साखळी लंपास केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
नागेश विकास मडके (वय ३३, रा. मागडी चाळ, तुळजापूर नाका, बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. हॉटेल भाग्यश्री, वडगाव शिवार, धाराशिव) हे हॉटेल भाग्यश्री येथे काम करीत असताना पांढऱ्या-निळ्या रंगाची निळ्या रेडियम असलेली इर्टीगा गाडी घेऊन आलेल्या सहा इसमांनी त्यांना फोटो काढण्याच्या बहाण्याने गाडी जवळ बोलावले. यानंतर त्यांचे दोन्ही हात गाडीच्या काचेत अडकवून त्यांना फरफटत नेत शिवीगाळ व मारहाण केली. त्याचवेळी कपाळावर बंदूक ठेवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मडके यांची गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली गेली.
या प्रकरणी नागेश मडके यांनी 26 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,115(2),119(1)352,351(2) शस्त्र अधिनियम 3(5),3,25 अन्वये गुन्हा नोंद करुन पोलिसांनी तपास सुरू केला त्यात 5 आरोपीना अटक केली. पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.