40 हजारांची लाच घेताना बालविकास अधिकारी अटकेत – परंडा येथे लाच लुचपत विभागाची कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथे लाचखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले असुन अंगणवाड्याना दिलेल्या गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने ही मोठी कारवाई केली असुन या कारवाईने प्रशासकीय यंत्रणातील सुरू असलेली लाचखोरी समोर आली आहे, बिल काढण्यासाठी आता लाचेच्या रकमेची रक्कम स्वीकारताना पै पै चा हिशोब केला जात आहे. या प्रकरणात चक्क प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे प्रमाणे लाचेची मागणी करण्यात आले.
परंडा तालुक्यातील अंगणवाडीना शासनाच्या योजनेप्रमाणे गॅस कनेक्शन देण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते.या एजन्सीला अंगणवाडीत प्रति गॅस कनेक्शन 6 हजार 533 रूपये 50 पैसे प्रमाणे 86 गॅस कनेक्शन देण्यात आले होते. या कामाचे 5 लाख 61 हजार 461 रुपये बिल काढण्यासाठी प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे असे 86 गॅस कनेक्शनचे 48 हजार 461 रुपये लाचेची मागणी बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके यांनी मागितली होती मात्र त्यावर तडजोड करून 40 हजार रुपये लाच स्वीकारताना गायके यांना रंगेहात पकडण्यात आले.गायके यांना अटक करण्यात आली असुन त्यांच्यावर परंडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.विशेष म्हणजे गायके यांना लाच स्वीकारण्याचा मोह रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आवरता आला नाही.कोणतेही शासकीय कामाचे बिल काढण्यासाठी लाच देण्याचा शिष्ठचार इथे जणू बनला आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटात हे प्रमाण चांगलेच वाढले आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडीत, पोलीस उप अधीक्षक प्रशांत सापते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा खासगी व्यक्ती शासकीय काम करून घेण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तक्रार देण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केले आहे.