26 हजारांची लाच घेताना दोघांना अटक, उस्मानाबाद लाचलूचपत विभागाची कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केलेल्या पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी 26 हजार रुपयांची लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकारी व कनिष्ठ सहायक या दोघांना उस्मानाबाद लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. यानिमित्ताने पोषण आहार योजनेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका तक्रारदार महिलेकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वाशी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सतिश उद्धवराव मुंढे व कनिष्ठ सहायक शहाबुद्दीन महमंद शेख यांनी 32 हजारांची लाचेची मागणी करून 26 हजार रुपये लाच घेतली. या प्रकरणात तब्बल 3 वेळेस लाच मागणी करण्यात आल्याने अखेर फिर्यादी महिलेने यांना चांगलाच धडा शिकवीला. 30 मार्च,22 व 25 एप्रिल रोजी लाचेची मागणी करण्यात आली.
तक्रारदार यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामिण प्रकल्प वाशी अंतर्गत वाशी येथील अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केलेल्या पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी तसेच यापूर्वी काढलेल्या बिलाचा मोबदला म्हणुन मुंडे यांनी 24 हजार रुपयाची मागणी करून पहिला हफ्ता म्हणून 20 हजार घेतले तर शेख यांनी स्वतः साठी 8 हजार मागणी करून 6 हजार रुपये घेतले.
औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी अशोक हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सापळा पथकात पोअ शिधेश्र्वर तावसकर, विशाल डोके ,विष्णु बेळे ,अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी काम केले.