धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी 2 महिने तपास करुन 36 आरोपी निष्पन्न केले, तब्बल 10 हजार 744 पानाचे दोषारोपपत्र धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले असुन ते दाखल करताना 22 आरोपीना फरार घोषित केले आहे. निष्पन्न आरोपीचे फोन पे, बँक व्यवहार, कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल यासह अन्य पुरावे जोडले आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या किंबहुना राज्यातील ड्रग्ज प्रकरणात हे सगळ्यात मोठे चार्जशीट ठरणार आहे, एका गुन्ह्यात 36 आरोपी निष्पन्न केले आहेत. पोलिसांनी 468 अणूक्रमांक असलेली फेरीस्त यादी कोर्टात सादर केली असुन त्यात साक्षीदार जबाब, पंचनामे, पुरावे यासह अन्य बाबी जोडल्या आहेत. काही आरोपीचे 100 ते 400 पेक्षा अधिक पानाचे फोन पे रेकॉर्ड जोडले आहे शिवाय वैद्यकीय कागदपत्रे जोडली आहेत. 36 पैकी 14 आरोपी जेलमध्ये असुन 9 जणांनी जामीनासाठी अर्ज केला आहे, 100 पेक्षा जास्त जणांना नोटीसा दिल्या असुन त्यात काय निष्पन्न होते हेही तितकेच महत्वाचे आहे. दोषारोप पत्रात प्रत्येकाचा सहभाग उपलब्ध पुराव्याच्या आधारे स्पष्ट केला असुन आणखी काही नवीन पुरावे मिळाल्यास त्यात बदल होऊ शकतो.
दोषारोप पत्रात अनेक धक्कादायक बाबी नमुद असुन काय दडलंय हे लवकरच स्पष्ट होणार आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी हे दोषरोप पत्र दाखल केले, यावेळी पुरावे व कागदपत्रे गठ्ठा पाहून सर्वजण चकीत झाले. पोलिसांनी 10 हजार 744 पाने जमा केली असुन ती पेन ड्राइव्हमध्ये सुद्धा दिली आहेत. विशेष म्हणजे ड्रग्ज प्रकरणात ज्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती व फरार आरोपी विनोद गंगणे यांचे बंधु विजय गंगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस मंगळवारी आरोपपत्र दाखल करणार असा दावा केला होता,तो अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. काही आरोपी दोषारोपपत्र कोर्टात सादर होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत फरार झाले आहेत, त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ड्रग्जचे मुंबई, पुणे, सोलापूर असे कनेक्शन उघड झाले असुन या दोषारोप पत्रात निष्पन्न आरोपी, कागदपत्रे, झालेला तपास, समोर आलेले व उपलब्ध पुराव्या आधारे पोलीस पुराव्याची साखळी जोडली आहे. ड्रग्ज तस्करीत प्रत्येकाचा सहभाग अधोरेखित केलेला आहे. ड्रग्ज तस्करासोबत झालेले बँक डिटेलचे आर्थिक व्यवहार, ऑडियो रेकॉर्डिंग तपासात सापडले असुन त्याचे आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत तसेच कॉल डिटेल व इतर पुरावे मिळाले आहेत. त्या आधारे तस्कर, पेडलर, व्यसन करणारे असे वर्गीकरण केले गेले आहे. ड्रग्ज तस्करीचा मुळं हेतू काय,कोण व का आणले? फायनान्सर कोण? किती संपत्ती कमावली? यासह अनेक मुद्दे पोलिसांनी कोर्टात रिमांड वेळी उपस्थितीत केले होते त्या सगळ्यांची उत्तरे या दोषारोप पत्रात असण्याची शक्यता आहे.
माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, नगराध्यक्ष यांचे पती विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अमित उर्फ चिमू अशोक आरगडे,युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, संगीता वैभव गोळे, संतोष अशोक खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहुराज चव्हाण, सुमित सुरेश शिंदे, ऋतूराज सोमनाथ गाडे, संकेत अनिल शिंदे,पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन नागनाथ साळुंके, राहुल सुनील कदम – परमेश्वर व गजानन प्रदीप हंगरगेकर हे 14 जण धाराशिव जेलमध्ये आहेत.
असा आहे घटनाक्रम (36) – तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली. पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली, त्यानंतर 15 एप्रिल ला कोर्टात चार्जशीट दाखल करताना माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना आरोपी करण्यात आले.