22 वर्षांपूर्वी चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसुत्र परत – उस्मानाबाद पोलिसांची कामगिरी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाने 1998 साली म्हणजेच 22 वर्षांपूर्वी चोरीला गेलेले अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र एका महिलेला दिल्याने तिचा आनंद गगणात मावेना असा झाला आहे. कळंब पोलिसांनी ही कामगिरी केली असून यामुळे पोलिसांची मान उंचावली आहे.
शकुंतला विठ्ठल शिंदे, रा. वाकरवाडी, ता. उस्मानाबाद यांचे 2.5 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र चोरीस गेल्याने कळंब पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गु.र.क्र. 85 / 1998 हा दाखल होता. तपासात आरोपीच्या ताब्यातून नमूद मंगळसुत्र जप्त करण्यात येउन आरोपी विरुध्द न्यालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते. नमूद गुन्ह्याची सुनावणी कळंब न्यायालयातील लोकअदालतीत 13.07.2019 रोजी झाली असता मुळ मालकास दागिने परत करण्याचा न्यायालयीन आदेश झाला होता. त्यास अनुसरुन कळंब पो.ठा. च्या पथकाने शकुंतला विठ्ठल शिंदे यांच्याशी संपर्क साधला. 02 मार्च रोजी कळंब पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या हस्ते ते मंगळसुत्र त्यांना परत करण्यात आले. 22 वर्षानंतर आपले मंगळसुत्र परत मिळाल्याने शकुंतला शिंदे यांचे डोळे आनंदाने पानावले. मंगळसुत्र परत मिळाल्याने त्यांनी कळंब पोलीसांचे आभार व्यक्त केले