धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 35 पैकी 21 आरोपी फरार आहेत, त्यातील एकालाही अटक करण्यात आले नसुन शोध सुरु आहे. फरार आरोपी पैकी एकाने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला आहे, फरार आरोपी पैकी काही जन मटका, जुगार, गुटखा तस्करीसह अनेक अवैध धंद्यात गुंतलेले असुन अनेक गुन्हे नोंद आहेत. या 21 आरोपीना पोलिस कधी अटक करणार हा प्रश्न आता नागरिकातून विचारला जात आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात गेल्या 10 दिवसात एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही तर नावे गोपनीय ठेवलेले ते 4 व पिनू तेलंग व वैभव गोळे असे 6 आरोपी जवळपास 1 महिन्यापासून जास्त काळ फरार आहेत. विनोद पिटू गंगणे यासह अन्य काही जन गुन्हा नोंद ते त्यांचे नाव येईपर्यंत महिनाभर खुलेआम फिरत होते मात्र नाव येताच गायब झाले, त्यांची नावे कोण फोडली व फरार होण्यास कोण मदत केली हे समोर येणे गरजेचे आहे.
तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग हा 20 फेब्रुवारी तर मुंबई येथील वैभव गोळे हा आरोपी 28 फेब्रुवारीपासुन फरार आहे. पोलिसांनी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे या 4 आरोपींची नावे गोपनीय ठेवत ती नावे 1 मार्च रोजी कोर्टात दिली होती ते आरोपी तेव्हापासुन फरार आहेत, या आरोपींची नावे पोलिसांनी 25 मार्चला उघड केली तर विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, गजानन हांग्या प्रदीप हंगरकर, शरद रामकृष्ण जमधडे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे, अभिजीत गव्हाड या 6 जणांची नावे 25 मार्च रोजी कोर्टात आरोपी म्हणुन जाहीर केली त्यातील हंगरगेकर वागळता इतर 5 जन फरार आहेत. विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे 10 आरोपी 26 मार्च पासुन फरार आहेत.
ड्रग्ज सुरुवातीला कोण आणले ? त्याचा हेतू काय? व्यापार व गुंतवणूक कोण केली? कोणाला आर्थिक व इतर फायदा झाला ? कमावलेला पैसा कुठे गुंतवला? पेडलरचे जाळे कसे निर्माण केले व कोणाकोणाला व्यसनांध केले? कोणाचे शोषण केले? या सिंडीकेटचा मास्टर माईंड कोण ? यासह अनेक प्रश्नाचे कोडं यां फरार आरोपीना अटक केल्यावर सुटणार आहे. तस्करीचा ‘आका’ व ‘बोका’ कोण हे अजुन समोर आले नाही. काही आरोपी राजकीय पक्ष व नेत्यांशी संबंधित असल्याने पोलिसांवर दबाव व हस्तक्षेप असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. या सर्व टीमच्या तपासामुळे रॅकेटचा भांडाफोड झाला.