धाराशिव -समय सारथी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीस धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी 20 वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली, या प्रकरणात विशेष शासकीय अभीयोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी काम पाहिले. आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके याला शिक्षा सुनावली आहे.
27 जानेवारी 2021 रोजी पिडीत मुलगी तीच्या मैत्रीणीकडे वही देण्यासाठी गेली असता ती परत न आल्याने वडिलांनी अज्ञात आरोपी विरोधात नळदुर्ग पोलिसात गुन्हा नोंद केला होता. सदर तपासात सागर घोडके, मुकेश भोरे व आनंद घोडके यांनी पिडीत मुलीला मैत्रिणीकडे जाताना घोडके याच्या घरी नेहून रात्रभर डांबून ठेवल्याचे व सागर घोडके याने तिच्यावर बळजबरीने दोन वेळेस लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले मात्र आनंद घोडके याच्या विरोधात सबळ पुरावा नसल्याने सागर घोडके व मुकेश भोरे या दोघांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले. पीएसआय एम एम शहा व भगवान मोरे यांनी तपास केला.
सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगताप यांच्याकडे झाली. या प्रकरणात 15 साक्षीदार तपासण्यात आले, यात पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय आर एस महेत्रे यांनी कामकाज पाहिले. पीडिता व वैद्यकीय अधिकारी यांचे अहवाल आणि साक्ष महत्वपूर्ण ठरली.
विशेष शासकीय अभियोकता सचिन सूर्यवंशी यांचा युक्तीवाद व समोर आलेला ठोस पुरावा ग्राहय धरून आरोपी सागर घोडके याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 नुसार 20 वर्ष सक्तमजुरी व 25 हजार दंड, कलम 363 नुसार 3 वर्ष शिक्षा व 5 हजार दंड आणि कलम 342 नुसार 6 महिने शिक्षा व 2 हजार दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम आरोपीने कोर्टात भरल्यावर पीडितेस देण्यात येणार असुन या प्रकरणात मुकेश भोरे याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.