धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम उर्फ मेंबर व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत ‘आदर व सन्मानाने’ प्रवेश केला. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश राजकीय दृष्टया महत्वाचा मानला जात आहे. या दोन्ही प्रवेशामुळे भाजपच्या पक्षीय ताकतीत व वैभवात भर पडल्याचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे ड्रग्ज तस्करीतील गुन्ह्यातील आरोपीना ‘राजाश्रय’ दिल्याची टीका होत आहे. पक्ष प्रवेशाच्या या यशस्वी कामगिरी नंतर आमदार पाटील यांची प्रतिमा जनमाणसात उजाळून निघाली आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांच्या खास कौशल्याने या मंडळीना भाजप पक्षाचे आचार, विचार, ध्येय, विकासाचे धोरण समजावून सांगत मत आणि मन परिवर्तन केले, त्यानंतर त्यांनी ‘निर्धार’ करीत भाजपचा झेंडा हाती घेतला असे सांगितले जात आहे. या सोहळ्यास भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थितीत होते. कदम यांनी आमदार राणाजगजीतसिंह यांचे या सोहळ्यात ‘चरणस्पर्श’ करीत भावी राजकीय कारकिर्दीसाठी ‘आशीर्वाद’ घेतले, सर्वांची राजकीय व प्रतिमा उंचवण्याची जबाबदारी आमदार पाटील यांच्या खांद्यावर आहे.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यातील अनेक आरोपीना एकाच छताखाली भाजप पक्षात आणण्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना ‘यश’ आले आहे, एक प्रकारे ते ‘आश्रयदाते’ ठरले आहेत. यापुर्वी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांनी आमदार पाटील यांच्यावर टीका केली होती, मात्र ड्रग्ज गुन्ह्यात झालेल्या ‘जेलवारी’ नंतर त्यांना त्यांची चुक ‘उमजली’ असल्याचे बोलले जात आहे.
ड्रग्ज गुन्ह्यात तस्करीसह इतर गंभीर आरोप असलेले आरोपी हे भाजप पक्षात येत असल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे तर दुसरीकडे झाले गेले विसरून जा.. मन मत परिवर्तन केल्याचे अभिमानाने सांगितले जात आहे. राजकीय अपरिहार्यता व बेरजेच्या राजकारणात सगळे माफ अशीच स्तिथी आहे.
ड्रग्ज हा गंभीर सामाजिक विषय असुन पुढची पिढी वाचवण्यासाठी योग्य ती माहिती देऊन स्वतः पोलखोल केल्याचा दावा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अनेक वेळा पत्रकार परिषदेत केला होता. ड्रग्जला जाहीर विरोध करणारे आमदार आता या पक्षप्रवेशाचे ‘गोडवे’ गाऊन कोणते ‘कारण’ देऊन ‘समर्थन’ करणार हे पाहावे लागेल.
कदम व कणे यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने काही अटीसह जामीन दिला आहे, ड्रग्ज गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत त्यांना ‘धाराशिव तहसील’ हद्द बंदी केली आहे. मुळात ड्रग्ज गुन्ह्यात घटना, पुरावे, साक्षीदार हे सगळे ‘तुळजापूर तहसील’ हद्दीतील आहेत, त्यामुळे पोलिस राजकीय दबावाला बळी न पडता तुळजापूर तहसील बंदी बाबत कोर्टात जाणार का ? हे पाहावे लागेल, यासाठी स्थानिक आमदार पाटील पुढाकार घेणार का ? हाही प्रश्न आहे.
माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांचे जुने वक्तव्य –
गेल्या 5 वर्षात कोणताही विकास न केल्याचे आरोप कदम यांनी केला होता. कागदावर नुसत्या पोकळ घोषणा झालेल्या आहेत. मी उघड उघड स्वतःच्या पक्षाच्या विद्यमान आमदारावर आरोप करतो आहे. 5 वर्षात आपण खुप मागे आलो आहोत, कागदावर फक्त घोषणाचा पाऊस पडलेला आहे. कोणताही निधी आलेला नाही. त्यासाठी आपल्या टीममधुन कोणीतरी एकाला आमदारकीला उभे राहणे गरजेचे आहे.
अशी झाली अटक, मिळाला जामीन –
22 जुन रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर यांना अकलूज सोलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांना पुणे येथून 21 जुलै रोजी अटक होती त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना 10 ऑक्टोबर रोजी सशर्त जामीन मंजुर केला. कणे व परमेश्वर यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत.










