धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील दाळींबजवळील शिवाजी नगर तांडा येथील दोन लहान मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. खेळताना पाय घसरून तलावात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन पोलीस याचा तपास करीत आहेत.
शिवाजी नगर तांडा येथील सुशांत योजक बाळु चव्हाण (5) व प्रमोद प्रकाश चव्हाण (8) अशी या मुलाची नावे आहेत. हे दोघे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आईसोबत शेतात गेले होते. आई काम करताना हे दोघे पाझर तलावाशेजारी खेळत होते. खेळताना पाय घसरून दोघेही तलावात पडले. त्यातच दोघांचाही बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या आईंनी शोध घेतला. शेवटी सायंकाळी पाचच्या सुमारास पाझर तलावात एका मुलाचा शर्ट पाण्यावर दिसून आले,त्यानंतर दोघांना तलावातून बाहेर काढण्यात आले. दाळींब येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. येणेगूर येथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.