18 मे व 19 मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरण मोहीम
कोविशिल्डचा पहिला व कोवक्सिनचा दुसरा डोस मिळणार
70 लसीकरण केंद्रावर 24 हजार 750 डोसचे नियोजन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरणबाबत दिलासादायक बातमी असून 18 मे व 19 मे या 2 दिवसात जिल्ह्यात लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. 45 वर्षाच्या पुढील नागरिक,फ्रंट लाईन वर्कर यांना कोविशिल्डचा पहिला व कोवक्सिनचा दुसरा डोस मिळणार आहे. 2 दिवस चालणाऱ्या या लसीकरण मोहिमेत 70 लसीकरण केंद्रावर 24 हजार 750 डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दिली आहे. 18 मे ला सकाळी 9 ते सायंकाळी 5 तर 19 मे ला सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हे लसीकरण केले जाणार आहे, जे नागरिक प्रथम लसीकरण केंद्रावर येतील त्यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे , केवळ पात्र नागरिकांना लस देण्यात येणार असल्याने गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
18 मे रोजी मंगळवारी 45 वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना, फ्रंट लाईन वर्कर यांना कोरोनाची कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 300 डोस प्रमाणे 13 हजार 200 डोस देण्यात येणार आहेत तर 11 आरोग्य उपकेंद्रात प्रत्येकी 200 प्रमाणे 2 हजार 200 डोस दिले जाणार असून यात उस्मानाबाद तालुक्यातील रुई ढोकी, तुळजापूर तालुक्यातील चिवरी, कुंभारी, जळकोटवाडी, उमरगा येथील त्रिकोळी, कोराळ, कळंब तालुकातील करंजकल्ला, कोथळा , वाटवडा,नायगाव, परंडा येथील पाचपिंपळा केंद्राचा समावेश आहे. उस्मानाबाद शहरातील वैराग रोड व रामनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी प्रत्येकी 300 डोस, पोलीस रुग्णालयात केवळ फ्रंट लाईन वर्करसाठी 300 डोस, ग्रामीण रुग्णालय मुरूम, सास्तुर, लोहारा , तेर , वाशी व भूम या 6 ठिकाणी प्रत्येकी 300, उपजिल्हा रुग्णालय उमरगा , तुळजापूर, कळंब व परंडा येथे प्रत्येकी 300 तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्येकी 500 डोस दिले जाणार आहेत.18 मे रोजी 70 केंद्रावर लसीकरण होणार असून यासाठी ऑनलाइन बुकिंग नोंदणी करणे गरजेचे नाही त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य व टोकन देऊन लस दिली जाणार आहे.
19 मे रोजी बुधवारी 9 लसीकरण केंद्रावर कोवक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. एकूण 4 हजार 450 डोस दिले जाणार आहेत. ज्या नागरिकांनी कोवक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत त्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. हा डोस केवळ 45 वर्षाच्या पुढील नागरिक व फ्रंट लाईन वर्कर यांना दिला जाणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात 1 हजार डोस दिले जाणार आहेत तर आयुर्वेदिक महाविद्यालयात केवळ फ्रंट लाईन वर्कर यांना 600 डोस दिले जाणार असून या ठिकाणी अन्य कोणत्याही नागरिकांनी गर्दी करू नये.उस्मानाबाद शहरातील रामनगर व वैराग रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रवर प्रत्येकी 300 डोस, पोलीस रुग्णालयात केवळ पोलीस व न्यायालय विभागातील अधिकारी कर्मचारी यांना 250 डोस तर उपजिल्हा रुग्णालय कळंब, तुळजापूर, उमरगा व परंडा या चार ठिकाणी प्रत्येकी 500 प्रमाणे डोस दिले जाणार आहेत. अधिक लस प्राप्त होताच इतर ठिकाणीही लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
18 व 19 मे चे लसीकरण हे केवळ 45 वर्षाच्या पुढील नागरिक व फ्रंट लाईन वर्कर यांना असल्याने इतर नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये तसेच जे पात्र नागरिक येतील त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.