लातुर – समय सारथी
मुंबईत वास्तव्याला असलेल्या पाच जणांनी ड्रग्जचा कच्चा माल आणून तो लातुर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा परिसरातील त्यांच्यापैकीच एकाच्या शेतात मिक्सिंग करण्याची यंत्रणा उभी केली होती. ती उद्ध्वस्त करीत अमली पदार्थ नियंत्रण शाखा व पोलिसांनी पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे सर्व जण मुंबईतच ड्रग्ज विक्री करीत असून, कारवाईदरम्यान तपास यंत्रणेने ड्रग्जचा 11 किलो कच्चा माल जप्त केला आहे. डीआरआयच्या पथकाने चाकूर पोलिसांत येऊन याबाबत तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबीता वाकडकर यांनी दिली.
मुंबईतील एका ड्रग्ज प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण शाखेचे पुणे येथील पथक एका संशयिताच्या शोधात चाकूर तालुक्यातील रोहिणा परिसरात गेले होते. सदर प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकाचे मूळ गाव चाकूर तालुक्यातील असल्याची माहिती यंत्रणेकडे होती. दरम्यान, शेतातील एका शेडमध्ये ड्रग्जचा कच्चा माल आणून गुपचूपपणे तो मिक्स करून पुन्हा मुंबईकडे पोहोचविण्याचा इरादा होता. तिथे धाड टाकल्यानंतर 11 किलो कच्चा माल जप्त केला. पाच जणांना अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता कोठडी सुनावण्यात आली आहे.
ड्रग्स प्रकरणामध्ये मीरा-भाईदरमधील पोलीस कर्मचारी असलेला प्रमोद संजय केंद्रे याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. प्रमोद केंद्रे हा मूळचा चाकूर तालुक्यातील रोहिना गावाचा रहिवासी आहे, त्याच्या शेतात एका पत्र्याच्या शेडमध्ये 3 एप्रिल 2025 पासून ड्रग्स बनवले जात असल्याचे उघड झाले आहे.